Jay Shah ICC New Chairman Journey : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आयसीसीने याबाबत मंगळवारी अधिकृत घोषणा केली आहे. जय शाह १ डिसेंबरपासून पदभार स्वीकारतील. जय शाह आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. जय शाह हे पाचवे भारतीय आहेत, जे आयसीसीचे अध्यपद भूषवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या अगोदर कोणत्या चार भारतीयांना आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले आहे? जाणून घेऊया.
१. जगमोहन दालमिया
जगमोहन दालमिया हे आयसीसीचे अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय होते. १९९७ ते २००० पर्यंत त्यांनी हे पद भूषवले. दालमिया यांच्या कार्यकाळात महत्त्वाचे प्रशासकीय बदल आणि क्रिकेटचे जागतिकीकरण करण्याचे प्रयत्न झाले. १९९६ चा विश्वचषक भारतीय उपखंडात आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर आयसीसीचा महसूल वाढवण्यातही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
२. शरद पवार
भारतीय राजकारणी शरद पवार २०१० ते २०१२ पर्यंत आयसीसीचे अध्यक्ष होते. शरद पवारांनी आपल्या कार्यकाळात खेळाचे प्रशासन बळकट करण्यावर आणि त्याचा जागतिक विस्तार वाढवण्यावर भर दिला. जगभरातील क्रिकेटच्या पायाभूत सुविधांमध्ये नवीन फॉरमॅट आणि सुधारणांबाबत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतही त्यांचा सक्रिय सहभाग होता.
३. एन. श्रीनिवासन
एन. श्रीनिवासन २०१४ मध्ये आयसीसीच्या गव्हर्नन्स मॉडेलची पुनर्रचना केल्यानंतर ते आयसीसीचे ते पहिले अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात “बिग थ्री” मॉडेलच्या परिचयासह अनेक महत्त्वपूर्ण बदल घडले, ज्या अंतर्गत भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला क्रिकेटच्या वित्त आणि प्रशासनावर अधिक नियंत्रण देण्यात आले. श्रीनिवासन यांचा कार्यकाळ प्रभावी असला तरी तो वादांनीही घेरला गेला होता.
हेही वाचा – Jay Shah ICC Chairman: जय शाह यांची ICC च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड, जागतिक क्रिकेटमध्ये आता भारताचा दबदबा
४. शशांक मनोहर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष शशांक मनोहर हे दोनदा आयसीसीचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांचा पहिला टर्म २०१५ मध्ये सुरू झाला, जेव्हा त्यांची नियुक्ती एन. श्रीनिवासन यांचे उत्तराधिकारी म्हणून करण्यात आली होती. यानंतर २०१८ मध्ये मनोहर दुसऱ्यांदा निवडून आले. त्यांच्या नेतृत्वादरम्यान, त्यांनी सदस्य राष्ट्रांमध्ये महसुलाचे अधिक न्याय्य वितरण साध्य करण्याच्या उद्देशाने आयसीसीच्या वित्त मॉडेल आणि प्रशासनाच्या संरचनेची पुनर्रचना करण्याच्या दिशेने काम केले.