राजकोट : वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत राहुल द्रविडच भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कायम राहणार असल्याचे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकानंतर द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. मात्र, डिसेंबर-जानेवारीमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी द्रविड आणि अन्य साहाय्यक प्रशिक्षकांना मुदतवाढ देण्यात आली होती.
हेही वाचा >>> वडिलांसमोर भारतासाठी खेळण्याचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद! भारताचा फलंदाज सर्फराज खानची प्रतिक्रिया
मात्र, त्यांचा कार्यकाळ किती असेल याबाबत कोणतीही माहिती ‘बीसीसीआय’कडून देण्यात आली नव्हती. परंतु जूनमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा द्रविडच सांभाळणार असल्याचे शहा यांनी सांगितले. ‘‘एकदिवसीय विश्वचषकानंतर राहुल भाईंना त्वरित दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निघायचे होते. त्यामुळे आम्हाला भेटण्याची संधी मिळाली नव्हती. अखेर आता आमची भेट झाली,’’ असे शहा म्हणाले. ‘‘राहुल द्रविडसारख्या दिग्गज व्यक्तीच्या कराराबाबत प्रश्न पडण्याची गरजच काय? ते ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत प्रशिक्षक असणार,’’ असेही शहा यांनी सांगितले.