ICC ODI World Cup 2023 Schedule Announced: आयसीसीने भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यासोबतच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे सामने कधी आणि कुठे होणार, याचीही घोषणा करण्यात आली आहे. यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी क्रिकेटच्या चाहत्यांना एक आवाहन केले आहे. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये खेळणार आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी चाहत्यांना आव्हान करताना एक ट्विट केले आहे. ते म्हणाले, “भारतासाठी अभिमानाचा क्षण! चौथ्यांदा आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक आयोजित करणे हा एक अविश्वसनीय सन्मान आहे. १२ शहरांच्या पार्श्वभूमीसह, आम्ही आमची समृद्ध विविधता आणि जागतिक दर्जाच्या क्रिकेट पायाभूत सुविधांचे प्रदर्शन करणार आहोत. एका अविस्मरणीय स्पर्धेसाठी सज्ज व्हा!”
भारताचे सामने ९ शहरांमध्ये होणार आहेत –
या विश्वचषकात भारतीय संघ देशभर फिरणार असून सर्वत्र सामने खेळणार आहे. भारत चेन्नई, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, धर्मशाला, लखनऊ, दिल्ली, पुणे आणि बंगळुरू येथे आपले सामने खेळणार आहे. भारतीय संघ विश्वचषक २०२३ मध्ये आपला पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. त्याच वेळी, १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोठा सामना पाहायला मिळेल.
हेही वाचा – Prithvi vs Sapana: ‘सपना गिलने पृथ्वी शॉला खोट्या आरोपात अडकवले’, विनयभंग प्रकरणात पोलिसांचे वक्तव्य
यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना पुण्यात होणार आहे. तर न्यूझीलंडशी सामना २२ ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथे होणार आहे. याशिवाय २९ ऑक्टोबर २०२३ रोजी लखनऊमध्ये इंग्लंड विरुद्धचा सामना होणार आहे.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघाचे वेळापत्रक –
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान – ११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान – १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश – १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड – २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड – २९ ऑक्टोबर, लखनऊ
भारत विरुद्ध क्वालिफायर – २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध क्वालिफायर – ११ नोव्हेंबर, बंगळुरू
या ठिकाणी होणार अंतिम आणि उपांत्य फेरीचे सामने –
एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबईत खेळवला जाईल. आणि दुसरा उपांत्य सामना १७ नोव्हेंबर २०१३ रोजी कोलकाता येथे खेळवला जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे.