Two names shortlisted for the post of Team India coach : भारतीय संघाने ११ वर्षानंतर आयसीसी ट्रॉफीचा दुष्का आणि १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावल्यानंतर आता टीम इंडियाचे मनोबल उंचावले आहे. टी-२० विश्वचषक २०२४ ट्रॉफी जिंकल्यानंतर, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याचबरोबर राहुल द्रविडने २०२४ च्या टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचाही निरोप घेतला आहे. त्यामुळे आता पुढील प्रशिक्षकाची नियुक्ती कधी होणार यावर अपडेट आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला नवा कोच मिळणार –

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोमवारी सांगितले की, या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेत सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळेल, मात्र, राहुल द्रविडची जागा नक्की कोण घेणार हे स्पष्ट केले नाही. द्रविडच्या जागी माजी सलामीवीर गौतम गंभीर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त होण्याची शक्यता आहे. क्रिकेट सल्लागार समितीने या कोचपदासाठी मुलाखती देखील घेतल्या आहेत.

टीम इंडियाच्या कोचपदासाठी दोन नावे शॉर्टलिस्ट –

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, निवडक माध्यमांशी बोलताना जय शाह ६ जुलैपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्याचा संदर्भ देत म्हणाले, “प्रशिक्षक आणि निवडकर्ते दोघेही लवकरच नियुक्त केले जातील. सीएसीने मुलाखती घेतल्या आहेत आणि दोन नावे निश्चित केली आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे, आम्ही त्यानुसार जाऊ. व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वेला जाणार आहे, परंतु नवीन प्रशिक्षक श्रीलंका मालिकेत सामील होतील.” भारतीय संघाला २७ जुलैपासून तीन टी-२० आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांसाठी श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे.

हेही वाचा – टी-२० विश्वचषकानंतर दिनेश कार्तिकला मिळाली मोठी जबाबदारी, ‘या’ संघाच्या बॅटिंग कोच आणि मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार

मीडिया वृत्तानुसार गौतम गंभीर आणि माजी भारतीय महिला प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमन यांना शॉर्टलिस्ट केले आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या कॅरेबियन दौऱ्यावर आहे, जिथे त्याने टी-२० विश्वचषकाच्या विजेतेपदाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक विजेतेपद पटकावले. यावेळी जय शाह यांनीही लवकरच निवडकर्त्याची नियुक्ती केली जाईल असे सांगितले आहे.

हेही वाचा – “…टी-२० कारकीर्दीला पूर्णविराम देण्यापेक्षा आणखी चांगलं काय असू शकतं’; विराट-रोहितच्या निवृत्तीवर गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य

टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर जय शाह यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे कौतुक केले. जय शाह म्हणाले, “गेल्या वर्षी आणि बार्बाडोसमध्येही तो कर्णधार होता. २०२३ मधील अंतिम सामना वगळता आम्ही सर्व सामने जिंकले. कारण ऑस्ट्रेलियाने चांगली कामगिरी केली. यावेळी आम्ही आणखी मेहनत घेतली आणि विजेतेपदासाठी चांगली कामगिरी केली. तुम्ही इतर संघ पाहिल्यास, अनुभव महत्त्वाचे आहेत. रोहितपासून विराटपर्यंत सर्वांनीच चमकदार कामगिरी केली. अनुभवाने खूप फरक पडतो, वर्ल्ड कपमध्ये तुम्ही जास्त प्रयोग करू शकत नाही. खेळाला कधी निरोप द्यायचा हे चांगल्या खेळाडूला माहीत असते.”