जगातील महान फलंदाजांपैकी एक भारताच्या सचिन तेंडुलकरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) मोठी जबाबदारी मिळू शकते. तेंडुलकरसोबतच सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठे चेहरे आहेत. सध्या गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष आहे, तर द्रविडला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. त्यांच्याशिवाय लक्ष्मणला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) प्रमुख करण्यात आले आहे. मात्र सचिनला आतापर्यंत बीसीसीआयमध्ये कोणतीही जबाबदारी मिळालेली नाही. मात्र, आता बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी संकेत दिले आहेत, की तेंडुलकरही नव्या भूमिकेत दिसू शकतो.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, ”द्रविडची मुख्य प्रशिक्षक आणि लक्ष्मणची एनसीए प्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर सचिनलाही बोर्डात भूमिका मिळू शकते.” यासाठी सचिनचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. सचिनला निवड समितीमध्ये भूमिका दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. त्याचवेळी सचिनकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
हेही वाचा – IND vs SA : कलाकारी जाफर..! द्रविडसाठी केलं भन्नाट ट्वीट; पोस्ट केला ‘विमल’चा फोटो!
गांगुलीने २०१९ मध्ये बीसीसीआयचा ३९वा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. त्याच्या आधी सीके खन्ना बीसीसीआयचे अध्यक्ष होते. २०१७ ते २०१९ या काळात त्यांनी हे पद भूषवले. याआधी अनुराग ठाकूर हे पद सांभाळत होते. गांगुली हा बीसीसीआयचे अध्यक्ष होणारा दुसरा कर्णधार आहे. त्याच्या आधी विजयनगरचे महाराज कुमार हे पहिले कर्णधार होते ज्यांना या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.