Jay Shah Awarded Sports Business Leader of the Year: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी आपल्या नावावर एक मोठी कामगिरी केली आहे. शाह यांना २०२३ क्रीडा व्यवसाय क्षेत्रातील विभागात ‘स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बीसीसीआयने शाह यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटवर पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनंदन केले, की “त्यांनी क्रिकेट जगतावर अमिट छाप सोडली आहे.”
बीसीसीआयने ट्वीट करून लिहिले, “बीसीसीआयचे मानद सचिव जय शाह यांना CII स्पोर्ट्स बिझनेस अवॉर्ड्स २०२३ मध्ये ‘स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल अभिनंदन. भारतीय क्रीडा प्रशासनातील कोणत्याही नेत्यासाठी हा पहिलाच सन्मान असून तो योग्य व्यक्तीला दिला आहे! त्यांचे हे नेतृत्व बीसीसीआयला जगात पुढे नेत आहे.”
बीसीसीआयने पुढे म्हटले आहे की, “ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करणे यासारख्या मोठ्या उपक्रमांनी क्रिकेट खेळ कायमचा बदलला आहे.” जय शाह यांनी क्रिकेट जगतात एक महत्त्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांचा क्रिकेट प्रशासनातील प्रवास गुजरात क्रिकेट असोसिएशनपासून सुरू झाला. गुजरात क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर, शाह यांनी वयाच्या ३१व्या वर्षी बीसीसीआयच्या मानद सचिवाची भूमिका स्वीकारली.
जय शाह यांनी २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी चाहत्यांना आणि खेळाडूंना खूप चांगल्या सुविधा दिल्या. विश्वचषक २०२३मध्ये भारत अनेक मोठे विक्रम रचण्यात यशस्वी ठरला. यामुळेच ही स्पर्धा आयसीसीची सर्वात यशस्वी स्पर्धा ठरली. कोविड-१९च्या महामारीतही त्यांनी बीसीसीआयचे नुकसान होऊ दिले नाही आणि बायो बबलमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
जय शाह यांनी केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील लोकांना क्रिकेट खेळ पाहण्यात कशी आवड निर्माण होईल यात महत्वपूर्ण भूमिका निभावली. यामुळेच एकूण विश्वचषक २०२३ सामने पाहण्याचा आकडा हा ५२ कोटींच्या पार गेला. हा विश्वचषक जवळपास ४२२ अब्ज मिनिटे पाहिला गेला, जे विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च वेळ आहे. जवळपास १३ कोटी लोकांनी टीव्हीवर एकाच वेळी अंतिम सामना पाहिला आणि त्याच वेळी हॉट स्टारवर ५.९ कोटी लोक सक्रिय होते.
दुसरीकडे, रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांना CII स्कोअरकार्ड २०२३ कार्यक्रमात ‘स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर – फिमेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नीता अंबानी यांना सोमवारी नवी दिल्लीत भारताची स्पोर्ट्स पुढे नेण्यासाठी त्यांच्या अनुकरणीय नेतृत्वासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रिलायन्स फाऊंडेशनला क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेचा दर्जा स्थापित करण्यासाठी ‘भारतातील सर्वोत्कृष्ट कॉर्पोरेट प्रमोटिंग स्पोर्ट्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.