टीम इंडियातून बाहेर असणारा पृथ्वी शॉ देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. पृथ्वी शॉने आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात मुंबईकडून विक्रमी खेळी केली. पृथ्वी शॉने ३७९ धावांची खेळी खेळली. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. पृथ्वी शॉच्या या खेळीबद्दल बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी कौतुक केले. त्यानंतर त्यांना ट्रोल केले जात आहे.
पृथ्वी शॉ २०२१ मध्ये भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हापासून तो टीम इंडियामध्ये परतला नाही. जय शाहने पृथ्वी शॉचे कौतुक केले आणि ट्विटमध्ये लिहिले, ”रेकॉर्ड बुकमध्ये आणखी एक मोठी नोंद. पृथ्वी शॉची किती अप्रतिम खेळी. रणजी करंडक स्पर्धेतील आतापर्यंतची दुसरी सर्वोत्तम धावसंख्या केल्याबद्दल अभिनंदन. सक्षम प्रतिभा, तुमचा अभिमान आहे.”
जय शाहने हे कौतुकाने भरलेले ट्विट करताच पृथ्वी शॉच्या चाहत्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. जय शाहला चाहत्यांनी विचारले की, जर तो इतका चांगला खेळत आहे, तर त्याला टीम इंडियात पुन्हा प्रवेश का मिळत नाही?
इशान किशन आणि पृथ्वी शॉसारख्या खेळाडूंना संधी का मिळत नाही, असा सवालही चाहत्यांनी केला, तर केएल राहुलला वारंवार अपयश येऊनही संघात संधी दिली जात आहे.