Jayden Seales Break Umesh Yadav Record in WI vs BAN 2nd Test : किंग्स्टनमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या जयडेन सील्सने दमदार गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटच्यामध्ये गेल्या ४६ वर्षात पहिल्यांदाच हा पराक्रम करण्यात आला आहे. जयडेन सील्सच्या भेदक गोलंदाजीमुळे बांगलादेशचा संघ दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात २०० धावांचा टप्पाही गाठू शकला. त्याने भारतीय गोलंदाज उमेश यादवचा विक्रम मोडून बांगलादेशविरुद्ध इतिहास रचला आहे.
जयडेन सील्सने मोडला उमेश यादवचा विक्रम –
जयडेन सील्सने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात १५.५ षटके गोलंदाजी करताना १० षटके निर्धाव टाकत ५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. या दरम्यान, त्याची इकॉनॉमी ०.३१ होती, जी १९७८ नंतर पुरुषांच्या कसोटी क्रिकेटमध्ये नोंदवलेली सर्वोत्तम इकॉनॉमी आहे. यापूर्वी हा विक्रम भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या नावावर होता, ज्याने २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत ०.४२ च्या इकॉनॉमीसह गोलंदाजी केली होती. उमेशने २१ षटकांतील १६ षटके निर्धाव टाकत आणि ९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. पण आता उमेश यादवचा हा विक्रम आता जयडेन सील्सने मोडला आहे.
या यादीत तिसरे नाव आहे ते मनिंदर सिंगचे आहे. त्याने १९८६ मध्ये इंग्लंडविरुद्ध २०.४ षटके टाकली आणि फक्त ९ धावा दिल्या होत्या. त्यापैकी १२ षटके निर्धाव होती आणि ३ विकेट्सही घेतल्या होत्या. ग्रेग चॅपलने १९७९ मध्ये इंग्लंडविरुद्ध ११ षटकांत ५ धावा देत, ६ षटके निर्धाव टाकत एक विकेट घेतली होती. या यादीतील पाचवा गोलंदाज ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन आहे, ज्याने २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २२ षटके गोलंदाजी करताना १७ निर्धाव षटके टाकत १० धावा दिल्या होत्या. मात्र, त्याला एकही विकेट मिळवता आली नव्हती. पण त्याचा इकॉनॉमी रेटही ०.४५ होता.
किंग्स्टन कसोटीत वेस्ट इंडिजचे वर्चस्व –
जयडेन सील्सने बाद केलेल्या फलंदाजांमध्ये लिटन दास, तस्किन अहमद, मेहदी हसन आणि नाहिद राणा यांचा समावेश होता. गोलंदाजीत जयडेन सील्सला शेमार जोसेफ आणि केमार रोचचीही साथ मिळाली. परिणामी बांगलादेशचा संघ पहिल्या डावात केवळ १६४ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनेही पहिल्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत १ बाद ७० धावा केल्या होत्या. म्हणजे यजमान वेस्ट इंडिज आता फक्त ९४ धावांनी पिछाडीवर आहे आणि त्यांच्या हातात ९ विकेट्स शिल्लक आहेत. अशा स्थितीत बांगलादेशला सामन्यात पुनरागमन करायचे असेल तर वेस्ट इंडिजच्या ९ विकेट्स झटपट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल.