भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून खेळला जात आहे. हा सामना ढाका येथील क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यासाठी जयदेव उनाडकटचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलाआहे. त्याला अनेक वर्षांनी कसोटी सामना खेळण्याची संधी मिळत आहे. तसेच उनाडकटने या सामन्यात एक मोठा विक्रमही केला आहे.
जयदेव उनाडकट २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत भारतासाठी एकमेव कसोटी खेळला होता. त्यानंतर त्याला लाल चेंडूच्या फॉरमॅटमध्ये संधी मिळाली नाही. आता १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याने कसोटी संघात पुनरागमन केले आहे. उनाडकटने गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली होती. त्याचे फळ म्हणून आता त्याला बांगलादेशविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळायला मिळाला आहे.
जयदेव उनाडकट २०१० ते २०२२ पर्यंत एकूण ११८ कसोटी सामन्यांना मुकला –
या सामन्यात उनाडकट खेळण्यासाठी उतरताच त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला. आता तो एका कसोटी पासून दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान सर्वात जास्त सामन्यांना मुकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने शेवटचा कसोटी सामना २०१० मध्ये खेळला होता. त्यानंतर आता तो २०२२ मध्ये खेळत आहे. अशा स्थितीत या १२ वर्षात त्याने एकूण ११८ कसोटी सामन्यांना मुकला आहे.
सर्वात जास्त सामन्यांना मुकण्याचा विक्रम गॅरेथ बॅटीच्या नावावर आहे. ज्यांनी २००५ ते २०१६ दरम्यान एकूण १४२ कसोटी सामन्यांना मुकला होता. तसेच उनाडकटच्या याआधी भारतासाठी हा विक्रम यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकच्या नावावर होता. २०१० मध्ये तो कसोटी सामना खेळला आणि त्यानंतर त्याला २०१८ मध्ये खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान तो ८७ कसोटी सामन्यांना मुकला होता.
सामन्याबद्दल बोलायचे तर, बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसराने त्यांनी २८ षटकानंतर २ बाद ८२ धावा केल्या आहेत. आर आश्विनने झाकिर हसनला बाद करत बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्याचबरोबर जयदेव उनाडकटने नजमुल हुसेन शांतोला बाद करुन भारताला दुसरे यश मिळवून दिले आहे.