जर्मन बॅडमिंटन स्पर्धा
जर्मन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अजय जयराम, आनंद पवार आणि अरविंद भट यांनी दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. जागतिक क्रमवारीत ३२व्या स्थानी असलेल्या अजय जयरामने फ्रान्सच्या ब्राइस लिवरडेझवर २१-१२, २१-१८ अशी मात केली. पुढच्या फेरीत त्याचा मुकाबला जपानच्या रिइची ताकेशिटाशी होणार आहे.
मुंबईच्या आनंद पवारने संघर्षमय लढतीनंतर ऑस्ट्रियाच्या मायकेल लॅहनस्टेनरला २२-२०, १६-२१, २१-१६ असे नमवले. आनंदची पुढची लढत डेन्मार्कच्या व्हिक्टर अक्सलेनशी होणार आहे. अरविंद भटने भारताच्याच अनुप श्रीधरचे आव्हान २१-१७, २१-१५ असे संपुष्टात आणले. पुढील फेरीत त्याच्यासमोर अव्वल मानांकित बूनसक पोनसन्नाचे आव्हान असणार आहे.
दरम्यान, गुरुसाईदत्तला पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. चीनच्या बिन क्विओने त्याचा २१-१७, २१-११ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत अरुण विष्णू आणि अपर्णा बालन यांनी मुख्य फेरीत प्रवेश केला. अश्विनी पोनप्पाने मिश्र दुहेरीत तरुण कोनाच्या साथीने रिकी विडियान्टो आणि पुस्पिता रिची डिली जोडीवर २३-२५, २१-१६, २१-१७ असा विजय मिळवला. महिला दुहेरीत प्रज्ञा गद्रेसह अश्विनीने नेदरलॅण्ड्सच्या समंथा बर्निग आणि इजिफी मुस्केन्सला २२-२०, २१-११ असे नमवले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा