तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी जवळ वसलेले टेकूराच्ची गाव हे भारतातल्या सर्वसाधारण गावांप्रमाणेच. परंतु काही दिवसांपूर्वीच या गावच्या सुपुत्राने जवळपास दहा लाख मिळाले. तेही लॉटरीद्वारे नव्हे, तर अथक मेहनतीने घडवलेल्या प्रयत्नांतून. कबड्डी विश्वाला नवा आयाम देणाऱ्या ‘प्रो कबड्डी लीग’च्या निमित्ताने ‘यु मुंबा’ संघाने तब्बल नऊ लाख, २० हजार रुपये खर्चून ३४ वर्षीय जिवा कुमारला आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. भारताचे दक्षिण टोक असलेल्या परिसरातला हा रांगडा गडी आता मुंबईच्या संघासाठी खेळणार आहे.
वडील शेतकरी, आई गृहिणी आणि तीन भावंडे असा जिवाचा परिवार. बेतास बेत आर्थिक परिस्थिती असलेल्या या कुटुंबातला जिवाचा मोठा भाऊ राजगोपाळ कबड्डी खेळत असे. त्यातूनच जिवाला कबड्डीपटू होण्याची प्रेरणा मिळाली. गावाजवळच्या अट्टनगराई क्लबमध्ये जिवाने कबड्डीची धुळाक्षरे गिरवली. होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देऊन देणारे रविचंद्रन जिवाचे पहिले प्रशिक्षक. तालुका, जिल्हा, राज्य अशा प्रत्येक टप्प्यावर आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या जिवाला २००३मध्ये गांधीनगरच्या साइ केंद्रातर्फे सर्वोत्तम दर्जाच्या प्रशिक्षणाची संधी मिळाली. कबड्डीपटू अशोक सुवर्णा यांच्या पुढाकारामुळे पश्चिम रेल्वेकरिता जिवाची निवड झाली. कुठल्याही परिस्थितीत मदतीला तत्पर असणारा मुंबईकरांचा जोश खूप काही शिकवणारा होता. याच काळात वडापावचा कट्टर चाहता झाल्याचे जिवा आवर्जून सांगतो. द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त कबड्डीपटू ई. प्रसाद राव यांच्या प्रयत्नांमुळे स्टेट बँक ऑफ म्हैसूरमध्ये जिवाची निवड झाली. चार तास काम आणि चार तास खेळाचा सराव असे त्याचे सध्याचे वेळापत्रक असते.
परिस्थितीशी झगडत ध्येय गाठण्याची आणि संयमाची शिकवण कबड्डीनेच जिवाला दिली. ‘प्रो कबड्डी’मुळे मिळणारा पैसा महत्त्वाचा आहे, मात्र यु मुंबा संघाला जेतेपद मिळवून देऊ शकलो तर या किमतीला न्याय दिल्यासारखे वाटेल असे जिवाने सांगितले. लीग स्वरुपाच्या स्पर्धेमुळे कबड्डीला आंतरराष्ट्रीय ओळख मिळणार आहे, तसेच युवा खेळाडूंचा कबड्डीविषयी असणारा दृष्टिकोन बदलेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला. मुंबईसह महाराष्ट्राला कबड्डीचा मोठा वारसा आहे. मुंबईतल्या वास्तव्यात स्थानिक कबड्डीपटूंच्या खेळातून अनेक गोष्टी शिकलो. मातीवरची कबड्डी मनाला भावणारी असली तरी व्यावसायिकता लक्षात घेऊन मॅटवर खेळणेच योग्य ठरेल, असे भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या जिवाने स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांसाठी तिकीटदरात ५० टक्के सूट
मुंबई : ‘प्रो कबड्डी’साठी चारशे आणि दोनशे रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आले आहे. www.bookmyshow.com या संकेतस्थळावर आणि ‘द मोबाइल स्टोअर’मध्ये ही तिकिटे उपलब्ध असतील. विद्यार्थ्यांसाठी या तिकीटांवर ५० टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच शहरातील कबड्डी मंडळांसाठी तिकीटांच्या दरात २५ टक्के सूट देण्यात आली आहे, अशी माहिती यु मुंबाकडून देण्यात आली आहे.