देवेंद्र पांडे, इंडियन एक्स्प्रेस प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Jemimah Rodrigues Khar Gymkhana Membership Cancellation: मुंबईतल्या जुन्या क्लब्सपैकी एक असलेल्या खार जिमखान्याने भारतीय महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. खार जिमखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जेमिमाचे वडील इव्हान हे जिमखान्याच्या परिसरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करत होते. ते समाजातील उपेक्षितांचं धर्मांतरही करुन घेत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.

रविवारी खार जिमखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा विषय पटावर ठेवण्यात आला. त्यानंतर जेमिमाचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी जेमिमा तसंच तिच्या वडिलांना फोन तसंच मेसेज करण्यात आला. मात्र ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.

कारवाईला दुजोरा देताना खार जिमखान्याचे अध्यक्ष विवेक देवनानी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, ‘जेमिमाला तीन वर्षांचं मानद सदस्यत्व क्लबने दिलं होतं. २० ऑक्टोबरला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हे सदस्यत्व रद्द करावं यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला’.

जेमिमाने सांगितला वादग्रस्त धावबादचा संपूर्ण घटनाक्रम, का स्वीकारावा लागला पंचांचा निर्णय?

खार जिमखाना कार्यकारिणी सदस्य शिव मल्होत्रा यांनी सदस्यत्व का रद्द करण्यात याची कारणं स्पष्ट केली. ते म्हणाले, जेमिमाचे वडील इव्हान हे ‘ब्रदर मॅन्युअल मिनिस्ट्रीज’ या संघटनेशी संलग्न असल्याचं आम्हाला समजलं. त्यांनी जिमखान्यातील प्रेसिडेन्शियल हॉल जवळपास दीड वर्षांसाठी वापरला. त्यांनी या कालावधीत तिथे ३५हून अधिक कार्यक्रम आयोजित केल्याचं आमच्या लक्षात आलं. त्या कार्यक्रमात काय चालायचं हे आम्हाला ठाऊक आहे’.

‘देशभरात अनेक ठिकाणी धर्मांतराचे प्रकार सुरू असल्याच्या बातम्या आपण वाचतो. पण हे सगळं जिमखान्यात घडत होतं. त्या कार्यक्रमात नृत्य चालायचं. अतिशय महाग अशी संगीत यंत्रणा आणली जायची. जायंट स्क्रीन बसवले जायचे. खार जिमखान्याच्या घटनेतील ४अ कलमानुसार क्लबमध्ये कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जाऊ शकत नाही’, असं त्यांनी सांगितलं.

आमच्या कर्मचाऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली असं खार जिमखान्याचे माजी अध्यक्ष नितीन गाडेकर यांनी सांगितलं. ‘मी, कार्यकारिणी सदस्य मल्होत्रा आणि अन्य काही सदस्य या कार्यक्रमात नेमकं काय चालतं हे पाहण्यासाठी गेलो. कार्यक्रमाच्या ठिकाणी गडद अंधार करण्यात आला होता. ट्रान्स पद्धतीचं संगीत लावण्यात आलं होतं. एक महिला उपस्थितांना सांगत होती की तो आपल्याला वाचवण्यासाठी येईल’.

ते पुढे म्हणाले, जिमखान्याने मुळातच अशा कार्यक्रमाला परवानगी कशी दिली याचं मला आश्चर्य वाटलं. आम्ही याचा निषेध नोंदवला. रविवारी झालेल्या वार्षिक सभेत सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला’.

गेल्या वर्षी खार जिमखान्याने जेमिमाला मानद सदस्यत्व दिलं जेणेकरून क्लबच्या प्रांगणात ती येऊन सराव करू शकते.

कोण आहे जेमिमा रॉड्रिग्ज?

२४वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज ही भारताची कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी२० अशा तिन्ही प्रकारात खेळणारी अव्वल फलंदाज आहे. तिने ३ कसोटी, २१ एकदिवसीय आणि ८० टी२० लढतीत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. मुंबईतल्या मैदानांमध्ये वयोगट स्पर्धांमध्ये सातत्याने चांगलं खेळल्यानंतर जेमिमाची भारतीय संघात निवड झाली. आक्रमक वेगवान खेळींसाठी जेमिमा प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर जेमिमाचे व्हीडिओ व्हायरल होत असतात. क्रिकेटपूर्वी जेमिमा महाराष्ट्राच्या हॉकी संघाकडून खेळली होती. आयपीएल स्पर्धेत जेमिमा दिल्ली कॅपिटल्स संघाचा अविभाज्य भाग आहे. ऑस्ट्रेलियात आयोजित बिग बॅश स्पर्धेतही जेमिमा खेळते. काही दिवसांपूर्वीच झालेल्या महिला टी२० स्पर्धेत भारतीय संघाला प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. या पराभवानंतर बोलताना भारताची माजी कर्णधार मिताली राज हिने टी२० प्रकारात जेमिमाचा नेतृत्वासाठी विचार व्हावा असं म्हटलं होतं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jemimah rodrigues memebership canceled by khar gymkhana as his father conducted religious programmes psp