Jemimah Rodrigues selected in Northern Superchargers squad: भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्जने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वेळा चमकदार कामगिरी केली आहे. तिने टी-२० लीगमध्येही चांगली कामगिरी केली आहे. जेमिमाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती इंग्लंडमध्ये होणाऱ्या द हंड्रेड स्पर्धेत खेळणार आहे. जेमिमाचा नॉर्दर्न सुपरचार्जर्सने संघात समावेश केला आहे. जेमिमाने नॉर्दर्न सुपरचार्जर्ससोबत करार केला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू हीदर ग्रॅहमच्या जागी तिचा संघात समावेश करण्यात आला आहे.
‘क्रिकइन्फो’च्या वृत्तानुसार, नॉर्दर्न सुपरचार्जर्सने या हंगामाच्या सुरुवातीला जेमिमाला रिटेन केले नव्हते. मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या दुखापतीमुळे जेमिमाशी पुन्हा करार केला आहे. ही स्पर्धा १ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. द हंड्रेडच्या या मोसमात सहभागी होणारी जेमिमा ही चौथी भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या अगोदर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना व्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोषने विविध संघांशी करार केला होता.
टीममध्ये नॉर्दर्न सुपरचार्जर्सने जेमिमा रॉड्रिग्जच्या समावेशाची माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. टीमने कॅप्शन लिहिले की, “पाहा २०२३ साठी कोण सामील होत आहे. हेदर ग्रॅहम आणि ऍशले हिली यांच्या जागी जेमिमा आणि फोबी यांनी स्थान पटकावले.
विशेष म्हणजे जेमिमाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द प्रभावी ठरली आहे. तिने आतापर्यंत खेळलेल्या २४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५२३ धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने ४ अर्धशतके झळकावली आहेत. जेमिमाने ८३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १७५१ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये तिने १० अर्धशतके केली आहेत. तिची सर्वोत्तम टी-२० आंतरराष्ट्रीय धावसंख्या ७६ धावा आहे. आता जेमिमा द हंड्रेडमध्ये खेळताना दिसणार आहे.