ख्राइस्टचर्चमधील एका बारबाहेर बुधवारी रात्री जबर मारहाण झाल्यामुळे न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर याला  चिंताजनक स्थितीत इस्पितळात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर मारहाण झाल्यामुळे रायडर कोमामध्ये असून, अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मेरिवले भागातील अ‍ॅकमॅन्स बारच्या बाहेर बुधवारी रात्री दोन किंवा तीन इसमांनी रायडरवर दोनदा प्राणघातक हल्ला केला, अशी माहिती ख्राइस्टचर्च पोलिसांनी दिली. २८ वर्षीय रायडर आयुष्याशी झुंज देत असून डोक्याच्या कवटीला आणि शरीराला गंभीर दुखापती झाल्या आहेत.
बुधवारी स्थानिक क्रिकेटमधील एकदिवसीय सामन्यात रायडर खेळत असलेल्या वेलिंग्डन क्रिकेट संघाचा उपांत्य सामन्यात पराभव झाला आणि त्यांचे आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर रात्री अ‍ॅकमॅन्स बारच्या बाहेर रायडरवर पहिला हल्ला झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फास्ट-फूड रेस्टॉरंटच्या पार्किंग परिसरात किमान दोन इसमांनी त्याच्यावर पाळत ठेवून दुसऱ्यांदा हल्ला केला. हा हल्ला झाला तेव्हा त्याचे दोन संघसहकारी रेस्टॉरंटमध्ये होते.
न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने रायडरवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची निर्भर्त्सना केली. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाइट यांनी पत्रकात म्हटले आहे की, ‘‘जेसीवर झालेला हल्ला आणि त्याची चिंताजनक स्थिती हे आम्हा सर्वासाठीच धक्कादायक आहे. न्यूझीलंड क्रिकेट रायडर आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सदैव असेल.’’ न्यूझीलंड प्लेअर्स असोसिएशनलाही या हल्ल्यामुळे धक्का बसला आहे.
गेल्या वर्षीपासून रायडरने स्वयंनिर्णयाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काही काळासाठी विश्रांती पत्करली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रायडरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले होते. दुखापतीतून सावरत असताना संघाच्या नियमांचे उल्लंघन करून मद्यसेवन केल्याप्रकरणी रायडरला या सामन्यानंतर ताकीद देण्यात आली होती.
राष्ट्रीय क्रिकेट संघाचे करारामधील मद्य आणि तंदुरुस्तीसंदर्भातील धोरण पुरेसे न पटल्यामुळे रायडरने त्यानंतरच्या सामन्यांसाठी आपण उपलब्ध नसल्याचेच सांगितले. या समस्यांवर मात करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडेही त्याच्यावर उपचार सुरू होते.
३ एप्रिलपासून आयपीलएच्या सहाव्या पर्वाला भारतात दिमाखात प्रारंभ होत आहे. रायडर दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. दिल्लीच्या फ्रेंचायझीने आयपीएल लिलावात त्याच्यासाठी दोन लाख ६० हजार अमेरिकन डॉलर्स मोजले आहेत. गेल्या वर्षीच्या आयपीएल हंगामात रायडरने पुणे वॉरियर्सचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी वैयक्तिक मानसोपचारतज्ज्ञ आणि व्यवस्थापक त्याच्यासोबत दिमतीला होते.

Story img Loader