क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, हे पुन्हा एकदा दिसून आले. गेले अडीच दिवस झारखंडचा संघ मुंबईवर अंकुश ठेवून होता खरा, पण सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर हा सामना दोलायमान अवस्थेत आहे. मुंबईचा पहिला डाव २६५ धावांवर आटोपल्यावर झारखंडने दुसऱ्या डावात ५ बाद १७६ अशी मजल मारली आहे. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर झारखंडकडे एकूण २६२ धावांची आघाडी असून मुंबईने सोमवारी सकाळच्या सत्रात झटपट बळी मिळवले, तर त्यांना विजयाची आशा राखता येऊ शकते.
हिकेन शाह (५८) आणि सूर्यकुमार यादव (६३) या दोघांनीही वैयक्तिक अर्धशतके झळकावली, पण २३६ धावसंख्येवर हे दोघेही बाद झाले आणि मुंबईला पहिल्या डावात २६५ धावाच करता आल्या. त्यानंतर झारखंडने दुसऱ्या डावाची चांगली सुरुवात केली असली तरी त्यांनी अखेरच्या सत्रात तीन फलंदाज गमावल्यामुळे सामना रंगतदार अवस्थेत आहे. ५१ धावांवर खेळणारा इशांक जग्गी मैदानावर असून, त्याच्यावर झारखंडची भिस्त असेल.

संक्षिप्त धावफलक
झारखंड (पहिला डाव) : ३५१
मुंबई (पहिला डाव) : ९१.५ षटकांत सर्वबाद २६५ (आदित्य तरे ६७, सूर्यकुमार यादव ६३, हिकेन शाह ५८; वरुण आरोन ४/४२)
झारखंड (दुसरा डाव) : ६५ षटकांत ५ बाद १७६ (इशांक जग्गी खेळत आहे ५१; जावेद खान २/२३)
अकबर खान जायबंदी
मुंबईचा डावखुरा वेगवान गोलंदाज अकबर खान झारखंडविरुद्धच्या सामन्यात जायबंदी झाला आहे. फलंदाजी करताना त्याच्या डाव्या हाताच्या अंगठय़ाला वरुण आरोनचा वेगवान चेंडू लागला. त्यामुळे तो गोलंदाजीसाठी मैदानात उतरू शकला नाही. त्याचा अंगठा ‘फ्रॅक्चर’ झाल्याचे वृत्त आहे.

Story img Loader