भारतीय महिला क्रिकेट संघ येत्या सप्टेंबर महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तिथे भारतीय संघाला टी २० आणि एकदिवसीय मालिका खेळायच्या आहेत. त्यासाठी संघाची निवड करण्यात आली. निवडलेल्या संघामध्ये भारताची अनुभव क्रिकेटपटू झुलन गोस्वामीचा समावेश करण्यात आला आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंड दौऱ्यात झुलन गोस्वामी निवृत्ती घेणार आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, “झुलन गोस्वामी लॉर्ड्सवर तिचा शेवटचा एकदिवसीय सामना खेळेल.” भारतीय संघाची वाटचाल आणि भविष्यासाठी तयारी करण्याबाबत निवडकर्त्यांनी झुलनशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेटमधील तिच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर शेवटचा सामना खेळण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
‘चकडा एक्सप्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेल्या झुलनने २००२ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तिने भारतीय महिला क्रिकेटसाठी योगदान दिले. आपल्या कारकिर्दीत तिने १२ कसोटी, २०१ एकदिवसीय आणि ६८ टी २० सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण ३५२ बळी घेतलेले आहेत.
१० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला तीन टी २० सामने खेळायचे आहेत. यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होईल. एकदिवसीय मालिकेला १८ सप्टेंबरपासून सुरुवात होईल. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २४ सप्टेंबरला होणार आहे. हाच सामना झुलन गोस्वामीच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरेल.
दरम्यान, झुलनला निरोप देताना निवड समितीने संघात एका नवख्या खेळाडूला संधी दिली आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या टी २० संघात किरण नवगिरे या महिला खेळाडूला संधी मिळाली आहे. किरण ही मूळची महाराष्ट्रातील सोलापूरची रहिवासी आहे. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती नागालँडच्या संघात पाहुणी खेळाडू म्हणून खेळते. किरणने गेल्या क्रिकेट हंगामात ‘वरिष्ठ महिला टी २० स्पर्धे’त ५४ चौकार आणि ३५ षटकारांसह ५२५ धावा फटकावल्या होत्या. तिच्या कामगिरीमुळे तिला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.