रांची येथे रंगलेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशम फलंदाजीत अपयशी ठरला. नुकत्याच पार पडेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये नीशम सेमीफायमलमध्ये हिरो ठरला होता. त्याच्या खेळीमुळे न्यूझीलंडने इंग्लंडला हरवत फायनलमध्ये धडक दिली होती. पण नीशमला सध्या सुरू अस़लेल्या भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत आपली छाप सोडता आली नाही.
दुसऱ्या टी-२० सामन्यात नीशम एका धावेसाठी झुंजताना दिसला आणि न्यूझीलंडच्या डावाच्या १८व्या षटकात भुवनेश्वर कुमारचा बळी ठरला. भुवनेश्वरच्या या षटकातील पहिल्या ४ चेंडूत फक्त २ धावा आल्या. यामुळे नीशम अस्वस्थ झाला आणि वेगवान धावा करण्याच्या प्रयत्नात त्याने भुवनेश्वरच्या पाचव्या चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटच्या तळाला लागला आणि बॅट तुटली आणि त्याचा तुटलेला भाग जमिनीवर पडला. पुढच्याच चेंडूवर भुवनेश्वरने नीशमला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याचा झेल यष्टीरक्षक ऋषभ पंतने टिपला.
हेही वाचा – IND vs NZ : कॅप्टनची एकच फाईट अन् वातावरण…! रोहितनं एका सामन्यात ठोकला विक्रमांचा ‘षटकार’; वाचा
असा रंगला सामना…
रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामना जिंकत तीन सामन्यांची मालिका खिशात टाकली आहे. रांचीमध्ये रंगलेल्या या सामन्यात रोहितने पुन्हा टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दमदार सुरुवात केलेल्या न्यूझीलंडचा संघ शेवटच्या षटकात धावा जमवण्यात अपयशी ठरला. २० षटकात न्यूझीलंडने ६ बाद १५३ धावा केल्या. भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने २५ धावांत २ बळी घेत उत्तम पदार्पण केले. शेवटच्या ३ षटकात न्यूझीलंडला १५ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकली. त्यांनी केलेल्या ११७ धावांच्या भागीदारीमुळे भारताला १७.२ षटकातच ७ गडी राखून हा विजय मिळाला. हर्षलला सामनावीर पुरस्कार मिळाला. तिसरा आणि अंतिम सामना २१ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे.