टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये बुधवारी एक आश्चर्यकारक निकाल लागला आणि जेतेपदासाठी प्रमुख दावेदार समजला जाणारा इंग्लंडचा संघ या स्पर्धेमधून बाहेर पडला. दोन वर्षांपूर्वी लॉडर्सवर झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर सरशी साधत इंग्लंडने पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. या पराभवाची परतफेड करण्यात अखेर न्यूझीलंडला यश आले. डॅरेल मिचेल (४७ चेंडूंत नाबाद ७२) आणि जिमी नीशाम (११ चेंडूंत २७) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडने बुधवारी इंग्लंडचा पाच गडी व एक षटक राखून पराभव करत टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावणारा जिमी नीशाम हा २०१७ सालीच क्रिकेटला रामराम करणार होता. मात्र त्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर केवळ संघात स्थानच मिळवलं नाही तर मौक्याच्या क्षणी महत्वपूर्ण खेळी करत संघाला पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाच्या अंतीम फेरीत घेऊन गेलाय.
नक्की वाचा >> …अन् सारा संघ विजयाचा जल्लोष करताना सामना जिंकवून देणारे मात्र खुर्च्यांवरुन हललेही नाहीत; फोटो होतोय व्हायरल
अबू धाबी येथील शेख जायद स्टेडियममध्ये झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने दिलेले १६७ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने १९ षटकांत गाठत न्यूझीलंडने पाच गडी राखून सामना जिंकला. मात्र या सामन्यात एक वेळ अशी होती की न्यूझीलंडला प्रत्येक षटकाला १२ हून अधिक धावा करण्याची गरज होती. या संकटाच्या प्रसंगी संघासाठी जिमी नीशाम हा देवासारखा धावून आला असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
क्रिस जॉर्डनने टाकलेल्या सामन्यातील १७ व्या षटकामध्ये जिमी नीशामने तब्बल २३ धावा करत सामन्याचं पारडं न्यूझीलंडच्या बाजूने झुकवलं. जिमी नीशामची ही छोटीशी पण महत्वपूर्ण खेळी न्यूझीलंडला सामना जिंकवून देण्यासाठी फार महत्वाची ठरली. ११ चेंडूंमध्ये २७ धावांच्या जिमी नीशामच्या या खेळीमुळेच न्यूझीलंडने सहा चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य गाठलं. जिमी नीशामच्या या खेळीनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने केलेलं एक ट्विट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
“जिमी नीशाम २०१७ मध्ये क्रिकेट सोडण्याचा विचार करत होता, आणि आज पाहा त्याने न्यूझीलंडला अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. सामन्याचा निकाल फिरवणारी खेळी त्याने केलीय. खेळ एक महान शिक्षक आहे जो आपल्याला कायम शिकवतो की कधीच हार मानू नका,” असं लक्ष्मण म्हणाला आहे.
अखेरच्या चार षटकांत ५७ धावांची गरज असताना नीशामने ख्रिस जॉर्डनच्या एकाच षटकात २३ धावा (२ वाइड आणि २ लेग बाय) फटकावल्या. तसेच न्यूझीलंडने पुढील दोन षटकांत ३४ धावा करत हा सामना जिंकला. डॅरेल मिचेलने सुरेख फटकेबाजी करत संघाला सामना जिंकून दिला. मिचेलच्या नाबाद ७२ धावांच्या खेळीत चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.