कबड्डीसारख्या मराठमोळ्या क्रीडाप्रकारातही कारकीर्द घडवण्याची भरपूर संधी आहे. पण त्यासाठी फक्त हातावर हात धरून न बसता कबड्डीची आस धरावी, असे पुणेरी पलटण संघाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू जितेश जोशी याने सांगितले. डोंबिवली येथील छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जितेशने आतापर्यंत अखिल भारतीय स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये आपल्या कौशल्याची चुणूक दाखविली आहे. २०१०-११चा शिवछत्रपती पुरस्काराचा मानही त्याला मिळाला आहे. पुणेरी पलटण संघात चढाईसाठीच त्याची निवड झाली आहे. प्रो कबड्डी लीगविषयी त्याने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.
*कबड्डी लीगमुळे या खेळाविषयी काय बदल जाणवत आहे?
  प्रो कबड्डी लीगमुळे हा खेळ वलयांकित होणार आहे. अनेक ठिकाणी या स्पर्धेविषयी पोस्टर्स लावली आहेत. विविध वाहिन्यांवर या स्पर्धेविषयी सातत्याने दाखविले जात आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडी कबड्डीचीच चर्चा आहे. स्पर्धेतील सहभागी संघांच्या अनेक खेळाडूंना भरपूर प्रसिद्धी मिळत आहे. अशी प्रसिद्धी सातत्याने मिळाली, तर हा खेळ लवकरच देशाच्या घराघरांत पोहोचण्यास वेळ लागणार नाही.
*तू ठाणे जिल्हय़ाचा खेळाडू असलास तरी तुला पुण्याच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे, त्याविषयी काय सांगशील?
कोणत्या संघाकडून मी खेळतो हे महत्त्वाचे नसून स्पर्धेत आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळत आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे. मी ज्या संघाकडून खेळत आहे, त्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणे हेच माझे ध्येय आहे. आमचा सराव चांगला झाला आहे. त्यामुळे आम्ही या स्पर्धेत विजेतेपद मिळवू अशी मला खात्री आहे.
*कबड्डीला आता चांगली प्रसिद्धी व पैसा मिळू लागला आहे काय?
कबड्डी हा खेळ आता गरिबांचा खेळ राहिलेला नाही. खेळाला भरपूर प्रसिद्धी मिळत आहे. अखिल भारतीय व राज्यस्तरावरील अनेक स्पर्धामध्ये भरघोस पारितोषिकांची कमाई खेळाडूंना करता येत आहे. कबड्डीत कारकीर्द घडवणे म्हणजे पायावर धोंडा पाडून घेणे असे म्हटले जात असे, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये खूप आमूलाग्र बदल झाला आहे. या खेळात कारकीर्द घडवणे सहज शक्य आहे. सायंकाळचा वेळ वाया घालविण्यापेक्षा मुला-मुलींनी मैदानावरील विविध खेळांत भाग घेतला पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. कबड्डीला आता सुगीचे दिवस आहेत. या खेळात कारकीर्द घडवणाऱ्यांना समाजात सन्मानाचे स्थान मिळत आहे.
*या खेळासाठी घरच्यांकडून तुला कसे प्रोत्साहन मिळाले?
माझे वडील शेतकरी असले, तरी त्यांनी मला खेळासाठी सतत प्रोत्साहन दिले. माझे सामने पाहण्यासाठी ते अनेक ठिकाणी येतात. आपला मुलगा खेळाडू आहे याचा त्यांना खूप अभिमान आहे. आता तर टीव्हीवरील माझे सामने पाहण्याची त्यांना उत्सुकता असते.
*मॅट व माती यापैकी कोणते मैदान तुला अधिक सोयीचे वाटते?
मी मुख्यत्वे: चढाई करणारा खेळाडू असल्यामुळे मॅटचे मैदान मला खूप अनुकूल वाटते. दोन्ही प्रकारच्या मैदानांवर दुखापती होतात. मात्र मॅटवर खरचटत नसल्यामुळे सूर मारताना किंवा कोलांटी उडी मारताना कधी त्रास होत नाही. मॅटवर जरी पाय मुडपण्याचा धोका असला तरी एकदा सवय झाल्यावर अशा दुखापती टाळता येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा