Joe Root Equals Rahul Dravid Record In Test Cricket: जो रूटने कसोटीमधील शतकांची परंपरा कायम ठेवत अजून एक दणदणीत शतक झळकावले आहे. वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह येथे न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जो रूटने आपले ३६ वे कसोटी शतक पूर्ण केले. यासह जो रूटने टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू राहुल द्रविडच्या विक्रमाची बरोबरी केली. रुटच्या दमदार शतकाच्या जोरावर इंग्लंड संघाने वेलिंग्टन कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात न्यूझीलंडला ५८३ धावांचे मोठे लक्ष्य दिले आहे.
सर्वाधिक शतकं लगावण्याच्या बाबतीत या क्रमांकावर पोहोचला जो रूट
वेलिंग्टन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर जो रूट अर्धशतक झळकावून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, त्याने तिसऱ्या दिवशी आपली शानदार खेळी सुरू ठेवली आणि आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३६वे शतक झळकावले. १३० चेंडूंमध्ये जो रूटने ११ चौकारांच्या मदतीने १०६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जो रूटने ओरूर्कच्या गोलंदाजीवर ९८ धावांवर असताना रिव्हर्स स्कूप खेळत चौकार लगावला आणि आपले शतक पूर्ण केले, रूटच्या या शॉटचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत जो रूट आता राहुल द्रविडसह संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग आणि कुमार संगकारा त्याच्या पुढे आहेत, ज्यामध्ये रूटने आणखी २ शतकं झळकावल्यास कुमार संगकाराची बरोबरी करेल.
२०२१ पासून जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये विस्फोटक फलंदाजी केली आहे, त्याने आतापर्यंत १९ शतकं झळकावली आहेत, ज्यामध्ये या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या किवी संघाचा अनुभवी खेळाडू केन विल्यमसनच्या बॅटमधून केवळ ९ शतकं झळकली आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हॅरी ब्रूकने यादरम्यान ८ शतक केली आहे. यावरून जो रूटच्या विस्फोटक फलंदाजीचा आणि फॉर्मचा आपण अंदाज लावू शकतो.
हेही वाचा – VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे
फॅब फोर
जो रूट – ३६ शतकं
केन विल्यमसन – ३२ शतकं
स्टीव्ह स्मिथ – ३२ शतकं
विराट कोहली -३० शतकं
जो रूटने वेलिंग्टन कसोटीत अर्धशतक पूर्ण करत एक नवा विक्रम केला. रूटने कसोटी क्रिकेटमध्ये १०० व्यांदा ५० अधिक धावा करण्याचा विक्रम केला. ही कामगिरी करणारा जो रूट जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. जो रूटच्या आधी सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस आणि रिकी पाँटिंग यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १०० पेक्षा जास्त वेळा ५० अधिक धावसंख्या करण्याचा विक्रम केला होता. या यादीत जो रुट एकमेव असा फलंदाज आहे जो सध्याच्या घडीला कसोटी क्रिकेट खेळत आहे. जो रूट नंतर या यादीत केन स्टीव्ह स्मिथ आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये त्यात ७३ वेळा ५० अधिक धावा केल्या आहेत. यानंतर अनुक्रमे केन विल्यमसन आणि विराट कोहली यांची नावं आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस ५० अधिक धावा करणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर – ११९ वेळा
जॅक कॅलिस – १०३ वेळा
रिकी पाँटिंग – १०३ वेळा
जो रूट – १०० वेळा