Joe Root Injured Little Finger in IND vs ENG 2nd Test : विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडिया ड्रायव्हिंग सीटवर असून पाहुण्या इंग्लंडच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, रविवारी इंग्लिश संघाला एक धक्का बसला आहे. त्यांचा स्टार फलंदाज जो रूट जखमी झाला आहे. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना त्याच्या उजव्या हाताच्या करंगळीला चेंडू लागला. यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. जर रूट तंदुरुस्त नसेल तर इंग्लिश संघाला चौथ्या डावात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणे फार कठीण होऊ शकते. या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडचा संघ १४३ धावांनी पिछाडीवर होता.
जो रुटची दुखापत इंग्लंडसाठी ठरु शकते डोकेदुखी –
आता इंग्लंडसमोर किमान ४०० धावांचे लक्ष्य असणार आहे. अशा परिस्थितीत जर रूट तंदुरुस्त नसेल तर त्याच्या अनुपस्थितीचा संघाला फटका बसू शकतो. एएनआयच्या वृत्तानुसार, जो रूटच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याच्यावर वैद्यकीय पथक उपचार करत असून तो मैदानाबाहेर आहे. त्यांच्या हाताला बर्फ वगैरेही लावला जात आहे. सद्य:स्थितीत वृत्त लिहिपर्यंत त्याच्या मैदानात परतण्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
रूट पहिल्या तीन डावात अपयशी –
या मालिकेत जो रूटने अद्याप नावाप्रमाणे फलंदाजी केलेली नाही. तीन डावात त्याच्या बॅटमधून केवळ ३६ धावा आल्या आहेत. हैदराबाद कसोटीत त्याने २९ आणि २ धावा केल्या होत्या. विशाखापट्टणममध्येही तो पहिल्या डावात केवळ ५ धावा करून बाद झाला होता. तो इंग्लंडच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. आता तो मैदानात कधी परततो हे पाहायचे आहे. ही दुखापत फारशी गंभीर नाही, अशी आशा इंग्लंड संघ आणि त्याचे चाहते करतील.
हेही वाचा – Rachin Ravindra : ‘CSK’साठी आनंदाची बातमी, स्टार फलंदाजाने कसोटीत झळकावले पहिले शतक
भारताची स्थिती मजबूत –
या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर भारताने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २५३ धावांत गारद झाला. यशस्वी जैस्वालने फलंदाजीत २०९ तर जसप्रीत बुमराहने गोलंदाजीत ६ विकेट घेत आश्चर्यकारक कामगिरी केली. आता शुबमन गिलने दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले आहे. भारतीय संघाकडे मोठी आघाडी असून आता इंग्लंडला किती लक्ष्य मिळते हे पाहायचे आहे.