Jofra Archer on Indian Primer League 2024: २०२४ टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग मधून माघार घेण्यास सांगितले आहे. २०२२च्या आयपीएलपूर्वी आर्चरला मुंबई इंडियन्सने ८ कोटी रुपयांना विकत घेतले होते, परंतु फ्रँचायझीने त्याला गेल्या आठवड्यात सोडले आहे. १९ डिसेंबर रोजी दुबईत होणाऱ्या आयपीएल लिलावाच्या यादीत त्याचे नाव नोंदवले गेले नाही.
आर्चरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत दुखापतींशी संघर्ष केला आहे. २०२१या वर्षी मे महिन्यात आयपीएलमध्ये खेळताना त्याला दुखापत झाली होती. यानंतर तो एकही क्रिकेट मालिका सामना खेळला नाही. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, “इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा असा विश्वास वाटतो की, जर आर्चर आयपीएलमध्ये खेळण्यासाठी भारतात येण्याऐवजी एप्रिल आणि मेमध्ये ब्रिटनमध्ये राहिला तर, त्याचे आगामी टी-२० विश्वचषक २०२४ संघात स्थान सुनिश्चित करण्यात मदत होईल. तो पुन्हा इंग्लंड संघात पुनरागमन करू शकतो.”
इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि जोफ्रा आर्चर यांच्यात करार…
इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अहवालानुसार, आर्चरने ईसीबी बरोबर दोन वर्षांचा नवीन करार केला आहे. पुढील वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी क्रिकेट बोर्ड त्याच्याबाबतीत कुठलीही जोखीम घेऊ इच्छित नाही. इंग्लंड क्रिकेट संघाचे फिजिओ पूर्णपणे त्याच्या कामगिरीवर नियंत्रण ठेवून आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन वर्षांसाठीचा हा करार ४ जून २०२४ पासून लागू होईल. या करारानंतर जोफ्रा आर्चरला इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या निर्णयानुसार काम करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच जोफ्रा आर्चरशी संबंधित निर्णय इंग्लंड क्रिकेट बोर्ड घेईल. तसेच, आगामी टी-२० विश्वचषक पाहता इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि जोफ्रा आर्चर यांच्यात करार झाला असल्याचेही समजते. टी-२० विश्वचषक २०२४ सुमारे सात महिन्यांनंतर वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे.
हेही वाचा: Ajay Jadeja: “इथे रिजेक्शन आहे, सिलेक्शन…”, भारतीय क्रिकेट निवड समितीच्या कारभारावर अजय जडेजा भडकला
काय म्हणाले इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक?
इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब कि यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, “आम्ही त्याच्यासमोर एक अट ठेवली आहे की, एकतर इंग्लंड बोर्डाचा करार सोडावा किंवा त्याने पुन्हा तंदुरुस्त व्हावे आणि इंग्लंडसाठी क्रिकेट खेळण्यास सक्षम व्हावे.” ते पुढे असेही म्हणाले की, “जर तुम्ही पुढील दोन वर्षांचा विचार केला तर तुम्हाला असे दिसून येईल की, अॅशेस व्यतिरिक्त टी-२० विश्वचषक २०२४ खेळायचा आहे. जोफ्रा आर्चर इंग्लंड संघासाठी मजबूत दुवा ठरू शकतो.”