मुंबई सर्वबाद १३६; हरयाणा दुसऱ्या डावात ९ बाद २२४
मुंबई आणि हरयणा यांच्यातील रणजी करंडक स्पर्धेचा दुसरा दिवस दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी चांगलाच गाजवला. दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी मिळून तब्बल १५ बळी मिळवल्याने दुसऱ्या दिवशीचा खेळ चांगलाच रंजकदार ठरला. जोगिंदर शर्माने पाच बळी मिळवल्याने हरयाणाला मुंबईला पहिल्या डावात १३६ धावांवर रोखता आले. त्यानंतर कर्णधार झहीर खान आणि विशाल दाभोळकर यांनी प्रत्येकी चार विकेट्स मिळवल्याने दुसऱ्या दिवस अखेर हरयाणाची ९ बाद २२४ अशी धावसंख्या आहे.
 ४ बाद १०० वरून पुढे खेळणाऱ्या मुंबईची जोिगदर शर्माच्या भेदक गोलंदाजीसमोर घसरगुंडी उडाली. केवळ ३६ धावांची भर घालत मुंबईचा डाव १३६ धावांत आटोपला. मुंबईला २ धावांची नाममात्र आघाडी मिळाली. यावेळी अजिंक्य रहाणेने ९ चौकारांच्या जोरावर ५१ धावांची सर्वाधिक खेळी साकारली. अर्धशतकी संयमी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला बाद करत जोगिंदरने हरयाणाला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. जोगिंदरने ११ षटकांत केवळ १६ धावांत ५ बळी टिपले.
पहिल्या डावात १३४ धावा करणाऱ्या हरयाणाची दुसऱ्या डावातही सुरुवात चांगली झाली नाही. मात्र यानंतर राहुल दिवाण आणि सनी सिंग या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. सनी सिंगला त्रिफळाचीत करत धवलने ही जोडी फोडली. सनीने ७८ चेंडूत ११ चौकारांसह ६३ धावा केल्या. भारतीय संघात पुनरागमनासाठी उत्सुक झहीर खान आणि युवा विशाल दाभोळकरने प्रत्येकी ४ बळी टिपले. हरयाणाने दुसऱ्या दिवसअखेर ९ बाद २२४ धावांची मजल मारली आहे. हरयाणाकडे २२२ धावांची आघाडी आहे.
हरयाणा (पहिला डाव) : १३४
मुंबई (पहिला डाव): ६२ षटकांत सर्व बाद १३६ (अजिंक्य रहाणे ५१; जोगिंदर शर्मा ५/१६)
हरयाणा (दुसरा डाव) : ६८ षटकांत ९ बाद २२४ (सनी सिंग ६३; विशाल दाभोळकर ४/५४, झहीर खान ४/५९)

Story img Loader