इशान्येकडील राज्यांमधली क्रीडासंस्कृती जपण्यासाठी बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सरसावला आहे. आसाम सरकारला फुटबॉल अकादमी उभी करण्यासाठी जॉन अब्राहम मदत करणार असल्याचं समजतंय. आसामचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली. इंडियन सुपर लिग (ISL) स्पर्धेत जॉन अब्राहमकडे, नॉर्थइस्ट युनायटेड एफसी या संघाची मालकी आहे. जॉनच्या संघात इशान्येकडील राज्यातील अनेक खेळाडूंना संधी देण्यात येते. आसाममध्ये खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देणं ही आमची जबाबदारी आहे, याच दृष्टीकोनातून आम्ही फुटबॉल अकादमी उभारण्यासाठी जॉन अब्राहमची मदत घेत असल्याचं, सोनोवाल यांनी स्पष्ट केलं.
या अकादमीत, आसाममधील होतकरु मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अकादमीसाठी सर्व सरकारी मदत आणि जागा देण्यास आसाम सरकारने तयारी दाखवलेली आहे. आगामी काळात आशियाई देशांतील नामांकित खेळाडूंना आसाममध्ये प्रशिक्षणासाठी घेऊन येण्याचं आश्वासन जॉन अब्राहमने आसाम सरकारला दिल्याचं समजतंय.
अवश्य वाचा – युवा खेळाडूंच्या संघाचे आय-लीगमध्ये पदार्पण