दक्षिण आफ्रिकेचा माजी क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्स हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मानला जातो. 1992 च्या विश्वचषकात इंझमाम उल हकला जॉन्टीने हवेत झेप घेऊन केलेलं धावबाद अजुनही क्रिकेट प्रेमींच्या स्मरणात आहे. आयसीसीच्या एका कार्यक्रमात बोलत असताना जॉन्टी ऱ्होड्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले सर्वोत्तम ५ क्षेत्ररक्षक सांगितले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या यादीत भारताच्या केवळ एका खेळाडूला स्थान मिळालं आहे. सुरेश रैनाच्या क्षेत्ररक्षण कौशल्यावर जॉन्टी ऱ्होड्स चांगला प्रभावित झालेला आहे.
ऱ्होड्सच्या मते ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अँड्रू सायमंड्स हा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे. सायमंड्स हा सीमारेषेवर आणि 30 यार्ड सर्कलच्या आत कुठेही व्यवस्थित चेंडू अडवू शकतो असं ऱ्होड्स म्हणाला. यानंतर जॉन्टीने आपले दक्षिण आफ्रिकी सहकारी हर्षेल गिब्ज आणि एबी डीव्हिलीयर्स याचसोबत इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूडलाही सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हटलं आहे. भारताच्या सुरेश रैनालाही जॉन्टीने सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांच्या यादीत स्थान दिलंय. भारतामध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षक शोधणं कठीण असल्याचंही जॉन्टीने मान्य केलं. मात्र भारतात आणि भारताबाहेर केलेल्या कामगिरीच्या जोरावर सुरेश रैना सर्वोत्तम असल्याचंही जॉन्टीने म्हटलंय.