Babar Azam Batting Position: नेपियरमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या अनुभवहीन संघाविरुद्ध पाकिस्तानला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक बासित अली यांनी पाकिस्तान संघावर टीका केली आहे. टी-२० मालिकेत ४-१ अशा दणदणीत पराभवानंतर, पाकिस्तान एकदिवसीय सामन्याच्या पहिल्या टप्प्यात पुनरागमन करेल असे वाटत असताना पाकिस्तानचा आघाडीचा फलंदाज बाबर आझम (७८) बाद झाल्यानंतर काही वेळातच पाकिस्तानची फलंदाजांची फळी ढासळली.

बाबर आझम बाद झाल्यानंतर, ३४५ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची अवस्था ४ बाद २४९ वरून सर्वबाद २७१ धावा अशी झाली आणि पाकिस्तानला ७३ धावांनी पराभव पत्करावा लागला. नेपियरमधील पाकिस्तानच्या या निराशाजनक कामगिरीचे विश्लेषण करताना बासित अली यांनी कडक शब्दात टीका केली आहे. यावेळी बसित अली यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “गेल्या महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत सलामीवीर म्हणून खेळलेला आणि अपयशी ठरलेला बाबर आझम या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला का आला?”

त्यांना बुटाने मारायला हवे

एका यूट्यूब चॅनलवर बोलताना बसित अली म्हणाले की, “बाबर तिसऱ्या क्रमांकावर का फलंदाजीला आला? तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलामीला आला होता. त्याला सलामीला फलंदाजी करायला सांगणारे प्रोफेसल आता कुठे आहेत? त्यांनी देशाची माफी मागावी. आता कोणीही पुढे येणार नाही. जे क्रिकेट प्रोफेसर बनण्याचा प्रयत्न करत होते त्यांना बुटाने मारायला हवे (इन्हे जूते मारणे चाहिए).”

पाकिस्तान क्रिकेट उध्वस्त करण्यास…

गेल्या काही वर्षांत पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीमध्ये झालेल्या घसरणीमागील कारणांवरही यावेळी बासित यांनी भाष्य केले. त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही परंतु असे संकेत दिले की, संघाच्या सध्याच्या परिस्थितीसाठी बाबर आणि एकदिवसीय कर्णधार मोहम्मद रिझवान यांना सलामीला फलंदाजीस पाठवणारा व्यक्ती जबाबदार आहे.

“ज्याने बाबर आणि रिझवानला सलामीवीर बनवले तोच पाकिस्तान क्रिकेट उध्वस्त करण्यास जबाबदार आहे. पाकिस्तान संघ आता एक फ्रँचायझी संघ बनला आहे. हा संघ आता पसंतींवर चालतो,” असे ते पुढे म्हणाले.

बुधवारी हॅमिल्टनमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात जर पाकिस्तानने न्यूझीलंड संघाला हरवले तर त्यांना मालिका जिवंत ठेवण्याचा आणखी एक संधी मिळेल.