नोव्हेंबर २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी आयसीसीने, तीन खेळाडूंना नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू (ICC Player of the Month) साठी नामांकित केले आहे. ज्यामध्ये दोन खेळाडू इंग्लंड संघाचे आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानचा एक खेळाडू देखील आहे. यामध्ये भारतीय संघाच्या एकाही खेळाडूच्या नावाचा समावेश नाही. या तिघांपैकी एकाला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार दिला जाणार आहे.
या यादीत आयसीसीने इंग्लंडचा जोस बटलर, आदिल रशीद आणि पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांना स्थान दिले आहे. विशेषमध्ये या यादीत एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळवता आले नाही. आता यापैकी कोणत्या खेळाडूला प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार दिला जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जोस बटलर (इंग्लंड) –
इंग्लडचा कर्णधार मर्यादीत षटकांचा कर्णधार जोस बटलरने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ज्यामुळे त्याच्या संघाला आयसीसी पुरुषांचा टी-२० विश्वचषक जिंकता आला. इंग्लंडच्या कर्णधाराने महिन्याची सुरुवात न्यूझीलंडविरुद्ध सामनावीर ठरत कामगिरीने केली. त्याने ४७ चेंडूत ७३ धावा केल्या होत्या आणि त्याच्या संघाने २० धावांनी विजय नोंदवला होता. त्याचबरोबर बटलरने भारताविरुद्ध उपांत्य फेरीतील सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली.जिथे त्याने १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अॅलेक्स हेल्ससह ४९ चेंडूत नाबाद ८० धावा केल्या.
आदिल रशिद (इंग्लंड) –
रशीदने सर्वात लहान फॉरमॅटमध्ये जागतिक दर्जाचा गोलंदाज म्हणून स्वत:ला वारंवार सिद्ध केले आहे. तसेच टी-२० विश्वचषक २०२२ विजेत्या इंग्लंड संघाचा भाग होता. त्याने फायनल सामन्यात २२ धावा देताना दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. ज्यामध्ये बाबर आझम आणि मोहम्मद हॅरिसच्या विकेटचा समावेश होता. नोव्हेंबरमध्ये इंग्लंडच्या संघातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक म्हणून त्याची ओळख सिद्ध केली आहे.
शाहीन शाह आफ्रिदी (पाकिस्तान) –
टी-२० विश्वचषक फायनलमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजीचे नेतृत्व करणारा आफ्रिदी पुन्हा एकदा विरोधी फलंदाजांसाठी कर्दन काळ ठरला आहे. त्याने महिन्याभरात ७.३०च्या प्रभावी सरासरीने दहा विकेट्स घेतल्या आहेत. तसेच बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने २२ धावा देताना चार विकेट्स घेतल्या. ज्यामुळे पाकिस्तान संघालाबाद फेरीपर्यंत पोहोचण्यास खुप मदत झाली. दुखापतीमुळे त्याला फायनलच्या सामन्यात मैदानाबाहेर जावे लागले होते.