चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला पुढील महिन्यात सुरू होणार आहे. आधीच विविध वादांच्या भोवऱ्यात सापडलेल्या या स्पर्धेत अजून एका वादाची भर पडली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यावरून वाद वाढत आहेत. १६० हून अधिक ब्रिटीश राजकारण्यांनी स्वाक्षऱ्या केलेले एक पत्र इंग्लंड क्रिकेट बोर्डाला दिले, ज्यात इंग्लंडने २६ फेब्रुवारी रोजी लाहोरमध्ये अफगाणिस्तानविरूद्ध सामना खेळण्यास नकार द्यावा असा युक्तिवाद केला आहे. यामुळे तालिबान राजवटीने महिलांच्या हक्कांच्या विरोधात अफगाणिस्तानच्या भूमिकेवर आक्षेप घेतला जाऊ शकतो.
आता या वादावर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरचे वक्तव्य समोर आले आहे. कोलकाता येथे भारत विरुद्ध टी-२० सामन्यापूर्वी बटलरने पत्रकार परिषदेत याबाबत बोलताना उत्तर दिले होते. “तज्ञांना याबद्दल बरंच काही माहित आहे, म्हणून मी (इंग्लंडचे क्रिकेट पुरूष संघाचे संचालक) रॉब की आणि इतर वरिष्ठ या मुद्द्याकडे कशाप्रकारे पाहत आहेत, हे समजून घेण्यासाठी मी त्याच्यांशी चर्चा करण्याचाप्रयत्न करीत आहे. हा बहिष्कार टाकण्याचा मार्ग नाही, असे मला वाटत नाही.” असं जोस बटलर म्हणाला.
२०२१ मध्ये तालिबान सत्तेवर आल्यापासून महिलांच्या खेळातील सहभागावर बंदी घालण्यात आली. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांचे उल्लंघन करणारे पाऊल आहे. जोस बटलर पुढे म्हणाला, “एक खेळाडू म्हणून राजकीय परिस्थितीचा खेळावर परिणाम होऊ द्यायचा नाही. आम्हाला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जाऊन खेळायच आहे आणि खूप चांगल्याप्रकारे या स्पर्धेत खेळायचे आहे.”
याशिवाय जोस बटलरने बीसीसीआयच्या नव्या नियमांबाबतही वक्तव्य केलं. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, खेळाडू ४५ दिवसांपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यावर कुटुंबाबरोबर दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ घालवू शकत नाहीत. भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेपूर्वी याबाबत बटलर म्हणाला, “हा खूप भारी प्रश्न आहे. कुटुंबाबरोबर राहणं महत्त्वाचं आहे. आपण आधुनिक जगात राहतो आणि क्रिकेट दौऱ्यांवर कुटुंब एकत्र असणं खूप चांगलं आहे.”
तो म्हणाला, “आजकाल खूप क्रिकेट खेळले जात आहे आणि खेळाडू बराच वेळ घराबाहेर घालवतात. कोरोनानंतर यावर बरीच चर्चा झाली आहे. मला वाटत नाही की कुटुंब सोबत राहिल्याने खेळावर फारसा फरक पडतो. सर्व गोष्टी मॅनेज करता येऊ शकतात. वैयक्तिकपणे माझा असा विश्वास आहे की घरापासून दूर राहण्याचं जे ओझ असत ते कुटुंबाबरोबर दौऱ्यांवर राहून हलकं केलं जाऊ शकतं आणि ते खूप महत्वाचं आहे.”