IND vs ENG Concussion Substitute Controversy: पुण्यातील इंग्लंडविरूद्धचा चौथा टी-२० सामना जिंकत भारताने टी-२० मालिकेत अभेद्य आघाडी मिळवली आणि मालिकाही आपल्या नावे केली आहे. पुण्यातील इंग्लंडच्या या पराभवानंतर हर्षित राणाच्या पदार्पणावरून वाद निर्माण झाला. या पराभवानंतर जोस बटलरने मोठं वक्तव्य केलं आहे. हर्षित राणाला शिवम दुबेच्या जागी कनक्शन सबस्टीट्यूट म्हणून मैदानात उतरावे लागले आणि दरम्यान त्याने गोलंदाजी करत महत्त्वपूर्ण ३ विकेट्सही घेतले.
इंग्लिश संघाचा कर्णधार जोस बटलरने या कनक्शन सबस्टीट्यूटवर मोठं वक्तव्य केलं आहे. जोस बटलर म्हणाला की, तो पुणे टी-२० मध्ये वापरल्या गेलेल्या कनक्शन सबस्टीट्यूटशी तो सहमत नाही. त्याच्या म्हणण्यानुसार यात चूक झाली असून त्याने थेट मॅच रेफरीच्या निर्णयावरच प्रश्न उपस्थित केले आहेत.
पुणे T20 मधील पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर पत्रकार परिषद घेण्यासाठी आली.यादरम्यान बोलताना बटलर म्हणाला, “ही लाईक फॉर लाईक रिप्लेसमेंट नव्हती आणि या निर्णयाशी सहमत नाही. एकतर शिवम दुबे २५ किमी प्रति तासपेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करत आहे किंवा हर्षितने खरोखरच त्याच्या फलंदाजीत सुधारणा केली आहे. हा खेळाचा एक भाग आणि आम्ही खरंच हा सामना जिंकणं अपेक्षित होतं. पण आम्ही या निर्णयाशी सहमत नाही.”
बटलरच्या मते सामनाधिकारींचा निर्णय योग्य नव्हता. खरं तर, भारतीय डावाच्या शेवटच्या षटकात चेंडू शिवम दुबेच्या हेल्मेटला लागला. मैदानाबाहेर गेल्यावर त्याने चक्कर आल्याचे सांगितले. यानंतर टीम इंडियाने त्याच्या जागी कनक्शन सबस्टीट्यूट खेळवण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने दुबेच्या जागी हर्षित राणाला घेतले. मॅच रेफरीने देखीय या निर्णयाला परवानगी दिली.
Concussion Substitute नियमानुसार, संघ ज्या खेळाडूला दुखापत झाली आहे त्याच्यासारख्याच दुसऱ्या खेळाडूला मैदानात उतरवू शकतो. म्हणजेच जर वेगवान गोलंदाजाला दुखापत झाली आहे तर दुसरा वेगवान गोलंदाज आणि फलंदाजाच्या जागी फलंदाज उतरवू शकतो, याला लाईक फॉर लाईक रिप्लेसमेंट म्हणतात. आता शिवम दुबे फलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे पण हर्षित राणा गोलंदाजी अष्टपैलू आहे. दोघांच्या गोलंदाजीत खूप फरक आहे, त्यामुळे नियमानुसार इंग्लंडच्या कर्णधाराने यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे हर्षित राणा इंग्लंडच्या पराभवाचे मुख्य कारण ठरला. राणाने त्याच्या पहिल्याच षटकात लियाम लिव्हिंगस्टनला बाद केले आणि त्यानंतर त्याने आणखी दोन विकेट घेतले. त्याने १९व्या षटकात केवळ ६ धावा दिल्या आणि त्याने ओव्हरटनची महत्त्वपूर्ण विकेटही घेतली, परिणामी इंग्लंडचा पराभव झाला. कनक्शन सबस्टीट्यूटच्या नियमामुळे इंग्लंडचे बरेच नुकसान झाले. यावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने देखील प्रश्न उपस्थित केला.