*४० हजार पाऊंडचा दंड  * स्टोक सिटीविरुद्धच्या लढतीला मुकणार
गैरवर्तवणूक आणि असभ्य भाषा वापरल्यामुळे चेल्सीचे प्रशिक्षक जोस मोरिन्हो यांच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. तसेच त्यांना ४० हजार पाऊंडचा आर्थिक दंडही भरावा लागणार आहे. या बंदीमुळे मोरिन्हो यांना शनिवारी होणाऱ्या स्टोक सिटीविरुद्धच्या लढतीला मुकावे लागणार आहे.
चेल्सीला गेल्या आठवडय़ात वेस्टहॅम सिटी युनायटेडकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर मोरिन्हो यांनी सामनाधिकारी जॉन मोस यांच्याशी गैरवर्तवणूक केली होती. त्यामुळे त्यांना स्टॅण्डमध्ये पाठवण्यात आले होते.
‘‘स्वतंत्र नियामक आयोगासमोर हा मुद्दा ठेवण्यात आला. त्यांच्या निर्णयानुसार मोरिन्हो यांच्यावर एका सामन्याची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ४० हजार पाऊंडचा दंडही सुनावण्यात आला,’’ अशी माहिती फुटबॉल असोसिएशनने आपल्या पत्रकातून दिली.
संघव्यवस्थापक म्हणून मोरिन्हो यांना सातत्याने अपयश आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा चेल्सी क्लब इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये १५व्या स्थानावर आहे. त्यांना अकरापैकी सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे पदही धोक्यात आले आहे.

Story img Loader