क्रिकेटविश्वात काही लढतींना कडव्या मुकाबल्याचं स्वरुप येतं. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणारी अॅशेस मालिका कट्टर प्रतिद्वंद्वासाठी ओळखली जाते. मैदानाबाहेर मित्र असणारे खेळाडू अॅशेस मालिकेत हाडवैरीप्रमाणे खेळतात. टेस्ट, वनडे, ट्वेन्टी२० काहीही असो- जगात कुठेही सामना असो, जोरदार जुगलबंदी रंगते. दोन्ही संघांच्या चाहत्यांचे मोठ्या प्रमाणावर पाठीराखे उपस्थित असतात. हे संदर्भ लक्षात घेता इंग्लंडमध्ये लहानाचा मोठा झालेला एक खेळाडू उमेदीच्या काळात ऑस्ट्रेलियाकडून खेळू लागतो असं सांगितलं तर. पण हे खरं आहे. ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप संघातील जोश इंगलिसची ही गोष्ट.
इंग्लंडमधल्या लीड्स भागात इंगलिस कुटुंबीय राहतात. लहानग्या जोशला घेऊन घरचे ऑस्ट्रेलियात फिरायला गेले होते. सिडनी, केर्न्स आणि पर्थ असा त्यांचा दौरा होता. ऑस्ट्रेलिया त्यांना मनापासून आवडलं. निसर्गसंपन्न देश, आर्थिकदृष्ट्या संपन्न अर्थव्यवस्था, विरळ लोकवस्ती हे सगळं इंगलिस कुटुंबीयांना भावलं आणि त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. इंगलिस कुटुंबीयांनी इंग्लंड सोडून ऑस्ट्रेलियातच स्थायिक व्हायचं ठरवलं. अर्थात हे एका रात्रीत शक्य होणार नव्हतं. हळूहळू एकेक गोष्ट जुळवत आणली आणि २०१० मध्ये इंगलिस कुटुंबीय ऑस्ट्रेलियात दाखल झालं. जोशचं वय होतं १४. तोवर तो इंग्लंडमधल्या यॉर्कशायर काऊंडी संघाच्या ज्युनियर संघाचा भाग होता. ऑस्ट्रेलिया म्हणजे पारंपरिक प्रतिस्पर्धी. त्यांना हरवायलाच हवं हे त्याच्या मनात बिंबत असतानाच जोश ऑस्ट्रेलियाचा झाला. ज्यांना हरवणं हे उद्दिष्ट होतं त्याच देशात तो दाखल झाला होता.
आणखी वाचा: अफगाणिस्तान विजयाचं भारतीय कनेक्शन
ऑस्ट्रेलियात शाळेत टीव्हीवर अॅशेस मालिका दाखवण्यात आल्याची आठवण जोश सांगतो. यॉर्कशायरचा शिलेदार असताना मायकेल वॉन आणि मॅथ्यू होगार्ड हे त्याच्या मित्रांसाठी आदर्श होते. जोशसाठी आता वेगळे आदर्श असणार होते. ऑस्ट्रेलियाचा संघ ज्या पद्धतीने खेळतो ते मला खूपच आवडलं. तेच माझ्या डोक्यात बसलं. चांगलं खेळायचं जेणेकरुन ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड व्हावी असं जोशचं स्वप्न होतं. मायकेल क्लार्क आणि अॅडम गिलख्रिस्ट यांचा तो चाहता झाला. फुटबॉल आणि रग्बी सामन्यावेळी जोश अजूनही इंग्लंडला पाठिंबा देतो पण जेव्हा गोष्ट क्रिकेटची असते तेव्हा जोश पक्का ऑस्ट्रेलियन असतो.
जोश लहानपणी लेगस्पिन गोलंदाजी करायचा. वय वाढत गेलं तसं विकेटकीपिंग आवडू लागलं. विकेटकीपिंगच्या बरोबरीने जोरदार टोलेबाजी करणं इंगलिसची ताकद आहे. सातत्याने चौकार, षटकार वसूल करण्यात इंगलिस वाकबगार आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेत जोश पर्थ स्क्रॉचर्स संघाकडून खेळतो. जोशच्या पोतडीत किती विविधांगी फटके आहे याची झलक त्याने सातत्याने दाखवली. याची दखल घेऊन जोशला २०२१ मध्ये झालेल्या ट्वेन्टी२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान देण्यात आलं. अर्थात त्याची भूमिका ही राखीव विकेटकीपरची होती. अॅलेक्स कॅरे ही संघाची पहिली पसंती होती.
वर्षभरात श्रीलंका दौऱ्यात जोशला वनडे आणि ट्वेन्टी२० पदार्पणाची संधी मिळाली. ५-६-७ यापैकी एका क्रमांकावर खेळत असल्याने जोशला मोठी खेळी करता आलेली नाही पण त्याची वेगाने धावा करण्याची क्षमता निवडसमितीने टिपली. भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी अॅलेक्स कॅरे हाच पहिल्या प्राधान्याचा विकेटकीपर बॅट्समन असणार होता. वर्ल्डकप दीड महिना चालतो तसंच दुखापतींची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक संघाने राखीव विकेटकीपर संघात घेतला आहे. कॅरे असल्यामुळे जोशला खेळायला मिळण्याची शक्यता नाममात्र होती. ऑस्ट्रेलियाचा संघ भसाभस बदल करत नाही. पण कॅरेला दोन सामन्यात लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. ऑस्ट्रेलियाच्या निवडसमितीने कॅरेचा अनुभव बाजूला ठेवत जोशला संधी देण्याचं ठरवलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोश अपयशी ठरला पण श्रीलंकेविरुद्ध त्याने ५८ धावांची चांगली खेळी केली. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात प्रचंड उकाडा असतो. अशा वातावरणात फिटनेस राखून ५० ओव्हर विकेटकीपिंग आणि नंतर बॅटिंग करणं आव्हानात्मक आहे. पण जोशने हे जमवलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्ससारखे दमदार वेगवान गोलंदाज आहेत आणि त्याचवेळी ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झंपासारखे फिरकीपटू आहेत. या दोन्ही प्रकारांसमोर जोश चांगलं विकेटकीपिंग करत आहे.
ऑस्ट्रेलियाला यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यातून सावरत ऑस्ट्रेलियाने विजयी पुनरागमन केलं. ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप पटकावयाचा असेल तर इंगलिसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.