ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा
वर्षांतल्या पहिल्यावहिल्या ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीत असणाऱ्या मारिया शारापोव्हा आणि व्हीनस विल्यम्स यांनी सहज विजय मिळवून तिसऱ्या फेरीत घोडदौड केली. पुरुषांमध्ये नोव्हाक जोकोव्हिच, टॉमस बर्डीच आणि डेव्हिड फेरर यांनी आगेकूच केली.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या शारापोव्हाने जपानच्या अनुनभवी मिसाकी डोईचा अवघ्या ४७ मिनिटांत ६-०, ६-० असा धुव्वा उडवला. शारापोव्हाने सलग २४ सामन्यांत विजय मिळवला असून, ग्रँड स्लॅम स्पर्धेत १९८५नंतर सलग दोन सामन्यांत निर्विवाद विजय मिळवणारी शारापोव्हा ही पहिली खेळाडू ठरली आहे. पहिल्या सामन्यात शारापोव्हाने ओल्गा पुचकोव्हालावरही दणदणीत विजय मिळवला होता. पुढील लढतीत शारापोव्हासमोर व्हीनस विल्यम्सचे आव्हान असणार आहे.
दुखापतींवर मात करत कोर्टवर उतरलेल्या व्हीनस विल्यम्सने अ‍ॅलिझे कॉर्नेटचा ६-३, ६-३ असा सहज पराभव केला. ऑकलंड आणि सिडनी स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या पोलंडच्या अ‍ॅग्निस्झेस्का रॅडव्हान्स्काने इरिना कॅमेलिया बेगूवर ६-३, ६-३ अशी मात करत तिसरी फेरी गाठली. जर्मनीच्या अँजेलिक्यू कर्बरने चेक प्रजासत्ताकच्या ल्युसी रॅडेकाला ६-३, ६-१ असे नमवले. चीनच्या लि नाने बेलारूसच्या ओल्गा गोव्हर्टसोव्हाचा संघर्षमय लढतीत ६-२, ७-५ असा विजय मिळवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.   दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूरला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. चीनच्या झेंग जिविरुद्ध सलग पाच गेम गमावल्याने स्टोसूरवर पराभवाची वेळ आली. झेंगने हा सामना ६-४, १-६, ७-५ असा जिंकला.  पुरुषांमध्ये, सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्यास उत्सुक असलेल्या जोकोव्हिचने अमेरिकेच्या रायन हॅरिसनचा ६-१, ६-२, ६-३ असा धुव्वा उडवला.
 तिसऱ्या फेरीत जोकोव्हिचची लढत सर्बियाच्याच जॅन्को टिप्सारेव्हिचशी होणार आहे. टिप्सारेव्हिचने ल्युकास लाकोचा ६-३, ६-४, ३-६, ४-६, ७-५ असा पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा