JSW Chairman Sajjan Jindal announcement for Indian medalist : सध्या फ्रान्समधील पॅरिस या शहरात ऑलिम्पिक २०२४ ही स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत जगभरातील विविध देशातील खेळाडू सहभागी झाले आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचे सहा दिवस पार पडले आहे. यामध्ये भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. भारताकडून मनू भाकेर, स्वप्नील कुसाळे आणि सरबज्योत सिंग यांनी नेमबाजीत कांस्यपदकावर निशाणा साधला आहे. आता पदक जिंकणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आहे. उद्योगपती आणि जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी पदक विजेत्यांना एक नवीन लक्झरी कार भेट देण्याचे आश्वासन दिले आहे.
या स्पर्धेत अजून अनेक भारतीय खेळाडू पदकांच्या शर्यतीत आहेत. तत्पूर्वा सज्जन जिंदाल यांनी एका एक्स पोस्टमध्ये जाहीर केले आहे की, ते पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील प्रत्येक भारतीय पदक विजेत्याला एमजी विंडसर कार भेट देतील. त्यांनी म्हटले आहे की खेळाडू त्यांच्या समर्पण आणि यशासाठी सर्वोत्तम पुरस्कारास पात्र आहेत. मॉरिस गॅरेजेस इंडियाने जेएसडब्ल्यू समूहाच्या सहकार्याने भारतात आपले नवीन सीयूव्ही एमजी विंडसर लाँच करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सज्जन जिंदाल यांनी हा निर्णय घेतला आहे.
सज्जन जिंदाल काय म्हणाले?
सज्जन जिंदाल यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिले की, “टीम इंडियाच्या प्रत्येक ऑलिम्पिक पदक विजेत्याला जेएसडब्ल्यू एमजी इंडियाकडून एक आलिशान एमजी विंडसर कार भेट दिली जाईल. हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे! आमचे सर्वोत्तम खेळाडू त्यांच्या समर्पण आणि यशासाठी सर्वोत्तम पुरस्कारासाठी पात्र आहेत.”
हेही वाचा – Swapnil Kusale Won Bronze : धोनीला आदर्श मानणारा करवीरनगरीचा शिलेदार, कोण आहे स्वप्नील कुसाळे? जाणून घ्या
यूके मध्ये १९२४ मध्ये स्थापित एमजी आधारित कंपनीने म्हटले आहे की, ही कार विंडसर कॅसल म्हणजेच ब्रिटनच्या शाही राजवाड्याच्या वास्तुकलापासून प्रेरित आहे. जिंदाल यांच्या पोस्टला ६४,००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लोकही त्यांच्या या निर्णायचे कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले, “उत्तम पुढाकार.” दुसरा युजर म्हणाला, “सुपर सर, तुमचे अभिनंदन.” तिसऱ्या यूजरने लिहिले, “अभिनंदन, उत्तम काम करत राहा.”विशेष म्हणजे यावर्षी टीम इंडियाचे ऑलिम्पिक किट जेएसडब्ल्यू ग्रुपनेच डिझाइन केले आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, हे किट मनाने आणि आत्म्याने भारतातील विविधतेचे प्रतिनिधित्व करते. हे अॅथलेटिक कामगिरी वाढविण्यासाठी प्रगत वैशिष्ट्यांसह डिझाइन केलेले आहे.
© IE Online Media Services (P) Ltd