वृत्तसंस्था, शांघाय
चीनच्या दोन ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंमध्ये झालेल्या महिला जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत जू वेन्जूनने टॅन झोंगयीचा नऊ डावांतच ६.५-२.५ असा पराभव करत पाचव्यांदा जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली. वेन्जूनने २०१८ सालापासून जगज्जेतेपदावर कब्जा राखला आहे.

महिला जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत १२ डाव नियोजित होते. मात्र, विजेतेपदासाठी आवश्यक ६.५ गुण वेन्जूनने अवघ्या नऊ डावांतच नोंदवल्याने उर्वरित तीन डाव खेळवण्याची गरज राहिली नाही. विशेष म्हणजे, ३४ वर्षीय वेन्जूनने आपले पहिले जगज्जेतेपदही झोंगयीला पराभूत करून मिळवले होते.

यंदाच्या लढतीतील पहिला डाव बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या डावात झोंगयीने बाजी मारली होती. मात्र, तिसऱ्या डावात वेन्जूनने दमदार पुनरागमन करताना विजयाची नोंद केली. चौथा डाव पुन्हा बरोबरीत सुटल्याने लढतीत चुरस निर्माण झाली. यानंतर वेन्जूनने आपला वेगळा दर्जा दाखवून देताना सलग चार डावांत सरशी साधत एकूण लढतीत ६-२ अशी मोठी आघाडी घेतली. त्यामुळे जेतेपद राखण्यासाठी वेन्जूनला उर्वरित चार डावांत एक बरोबरीही पुरेशी ठरणार होती. वेन्जूनने नवव्या डावातच आवश्यक बरोबरी नोंदवत अर्धा गुण कमावला आणि जगज्जेतेपद आपल्याकडेच राखले.

अलौकिक यश…

पाच वेळा जगज्जेतेपद मिळवणारी जू वेन्जून ही चौथी महिला बुद्धिबळपटू आहे. तिने सर्वप्रथम २०१८ मध्ये टॅन झोंगयीलाच पराभूत करत जगज्जेतेपद मिळवले होते. पुढील वर्षी ६४ खेळाडूंच्या स्पर्धेत सरशी साधत, मग अलेक्सांड्रा गोर्याचकिना (२०२०), ले टिंगजे (२०२३) आणि आता झोंगयी (२०२५) यांना जागतिक अजिंक्यपद लढतीत पराभूत करत वेन्जूनने जेतेपद आपल्याकडे राखले.