मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश हेमंत गोखले आणि व्ही. एम. कानडे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनवर प्रशासक म्हणून काम करु शकणार नसल्याचं न्यायालयाला कळवलं आहे. प्रशासक म्हणून काम करत असताना MCA शी संलग्न सभासदांकडून धमकीचे ई-मेल येत असल्यामुळे अशा वातावरणात आपण काम करु शकणार नाही असा पवित्रा न्यायाधीशांनी घेतल्याचं कळतंय. लोढा समितीने सुचवलेल्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने हेमंत गोखले आणि व्ही. एम. कानडे यांची नियुक्ती केली होती. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रशासकीय समितीने आपला गुप्त अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला आहे. प्रशासकांनी पदभार स्विकारल्यानंतर आतापर्यंत किती काम करण्याच आलं याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. जस्टीस भूषण गवई यांना सादर करण्यात आलेल्या अहवालात निवृत्त न्यायाधिश गोखले आणि कानडे यांनी अशा अपमानजनक वातावरणात काम करणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे.
ई-मेल मध्ये वापरण्यात आलेली भाषा असभ्य आहे, याचसोबत MCA चा कोणताही सदस्य कामात सहकार्य करत नाही. तसेच प्रशासकांनी घेतलेल्या निर्णयावर MCA चे सदस्य टीका करत बसतात. प्रशासकांच्या नेमणुकीमुळे नाराज असलेल्या काही सदस्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालय पुढे नेमका काय निर्णय घेतोय हे पहावं लागणार आहे.