इंग्लंडविरुद्धच्या गेल्या सामन्यात भारताचा सलामवीर शिखर धवन तिसऱ्याच षटकात बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी कोण येणार, हे पाहण्यासाठी सर्वांचे डोळे भारतीय ड्रेसिंग रूमकडे लागले होते. साधारण सहा महिन्यांपूर्वी याविषयी क्रिकेट रसिकांना विचारले असते, तर कोणीही बेधडक विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येणार असे उत्तर दिले असते. मात्र, गेल्या काही दिवसांत ही परिस्थिती काहीशी बदललेली दिसते. यापूर्वी संघातील तिसऱ्या क्रमांकाचा अनभिषिक्त दावेदार असणारा कोहली गेल्या आठ सामन्यांमध्ये फक्त एकदाच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आहे. यावरूनच सगळ्या गोष्टी लक्षात येतील. इंग्लडविरुद्धच्या सामन्यात धवन बाद झाल्यानंतर कोहली मैदानावर उतरेल, असे वाटत असतानाच अचानकपणे अंबाती रायडूला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी धाडण्यात आले. दुर्देवाने त्यावेळी रायडू ५३ चेंडूत अवघ्या २३ धावा करून माघारी परतला. तर दोन विकेट पडल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेला विराट कोहलीही फक्त आठ चेंडूपर्यंतच मैदानावर तग धरू शकला. विराटच्या फलंदाजीच्या क्रमवारीत झालेला बदल या अपयशासाठी कारणीभूत असल्याची टीका अनेकजणांनी त्यावेळी केली. मात्र, भारताची मधली फळी मजबूत करण्यासाठी विराटच्या फलंदाजीच्या क्रमांकात बदल करण्यात आल्याचे स्पष्टीकरण कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून देण्यात आले. आगामी विश्वचषकाच्या रणनीतीचा भाग म्हणून संघाची मधली आणि खालची फळी बळकट करण्यासाठी अशाप्रकारचे प्रयोग सुरू असल्याचेही त्याने म्हटले.
सध्याच्या रचनेत रविंद्र जडेजा संघात नाही. गेल्या सामन्यात स्टुअर्ट बिन्नीने चांगली फलंदाजी केली होती. मात्र, संघामध्ये अक्षर पटेल आणि आर. अश्विन या दोघांचा एकाचवेळी समावेश करायचा झाल्यास त्याला बाहेर बसावे लागेल. त्यामुळे मी आणि सुरेश रैना बाद झाल्यानंतर मागे संघाचा डाव सावरायला कोणीच उरत नाही. त्यामुळेच कोहलीला चौथ्या क्रमाकांवर आणून भारतीय संघाची फलंदाजी आणखी मजबूत करण्याचा इरादा असल्याचे धोनीने सांगितले. मात्र, समजा सलामीच्या जोडीने एखाद्या सामन्यात सुरूवातीची पॉवर प्लेची षटके विकेट न गमावता खेळून काढली तर कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर पाठवता येईल. मात्र, परिस्थिती उलटली आणि १२व्या किंवा १३ षटकांतच सलामीचे फलंदाज बाद झाले, तर विराटमध्ये एक बाजू लावून धरण्याची चांगली क्षमता आहे. जेणेकरून, संघाची पडझड थांबून इतर फलंदाजांकडून विराटला योग्य साथ मिळण्याची शक्यता असल्याचे धोनीने सांगितले.
वर्ल्डकप रणनीतीसाठी कोहलीच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल
इंग्लंडविरुद्धच्या गेल्या सामन्यात भारताचा सलामवीर शिखर धवन तिसऱ्याच षटकात बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी कोण येणार, हे पाहण्यासाठी सर्वांचे डोळे भारतीय ड्रेसिंग रूमकडे लागले होते.
![वर्ल्डकप रणनीतीसाठी कोहलीच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/03/viratkohliapm22.jpg?w=1024)
First published on: 21-01-2015 at 04:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Juggling virat kohlis batting position is part of world cup strategy mahendra singh dhoni