न्यूयॉर्क : अर्जुन एरिगेसी आणि आर. प्रज्ञानंद या भारताच्या युवा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंनी ज्युलियस बेअर जनरेशन चषक ऑनलाइन जलद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अर्जुन आणि प्रज्ञानंद यांनी प्राथमिक फेरीत अनुक्रमे दुसरे आणि चौथे स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. नॉर्वेच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने ३४ गुणांसह प्राथमिक फेरीत अग्रस्थान पटकावले. दुसऱ्या स्थानावरील अर्जुनच्या खात्यावर २५ गुण आणि तिसऱ्या स्थानावरील अमेरिकेच्या हान्स निमनचे २४ गुण होते.
पहिल्या दिवशी तीन विजयांची नोंद करणाऱ्या प्रज्ञानंदने २३ गुणांसह चौथे स्थान मिळवले. त्याने प्राथमिक फेरीत पाच लढती जिंकल्या आणि त्याच्या आठ लढती बरोबरीत सुटल्या. त्याला दोन लढतींमध्ये पराभव पत्करावा लागला. १९ वर्षीय अर्जुनला प्राथमिक फेरीच्या अखेरच्या दिवशी चांगला खेळ करण्यात अपयश आले. पोलंडच्या वोजताजेकविरुद्धची लढत बरोबरीत सोडवल्यानंतर अर्जुनने व्हिन्सेन्ट केयमार आणि अनिश गिरी यांच्याविरुद्धचे सामने गमावले. भारताचा तिसरा बुद्धिबळपटू बी. अधिबन १६व्या आणि अखेरच्या स्थानावर राहिला.