ऋषिकेश बामणे, लोकसत्ता

जबलपूर (मध्य प्रदेश) : एकीकडे खो-खो क्रीडा प्रकाराच्या पहिल्या विश्वचषकाची घोषणा केल्यावर बहुप्रतीक्षित अल्टिमेट लीगला कधी प्रारंभ होणार, यासंबंधी अनेकांना उत्सुकता होती. अखेर पुढील वर्षी ४ ते २६ जूनदरम्यान या लीगचे पहिले पर्व रंगेल, असे भारतीय खो-खो महासंघाचे सरचिटणीस महेंद्रसिंह त्यागी यांनी बुधवारी जाहीर केले.

एप्रिल २०१९मध्ये सर्वप्रथम अल्टिमेट लीग खेळवण्याची संकल्पना मांडण्यात आली. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत महासंघ प्रयत्नशील होता. परंतु विविध कारणांनी दोन वर्षे उलटली तरी अल्टिमेट लीग लांबणीवर पडत गेली. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी खो-खोच्या मूळ नियमांमध्ये बदल करून ही स्पर्धा खेळवण्याचा त्यागी विचार करत असल्याने महाराष्ट्रातील असंख्य संघटक तसेच माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. त्यागी यांनी मात्र खेळाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील विकासासाठी हे गरजेचे असल्याचे सांगितले.

‘‘परंपरेनुसार चालत आलेल्या प्रथेत एखाद्याने बदल करायचा निर्णय घेतला की त्याला विरोध होणे स्वाभाविक आहे. इतक्या वर्षांपासून राष्ट्रीय स्पर्धा आपण आयोजित करतच आहोत. परंतु नव्या नियमांच्या अल्टिमेट लीगमुळे खो-खो जगभरात पोहोचेल. जितक्या कमी वेळात निकाल लागतो, तितके चाहते अधिक आकर्षित होतात. तसेच गुंतवणुकीचे पर्यायही वाढतात,’’ असे त्यागी म्हणाले.  मात्र लीगमधील एकाही नियमावर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही, असेही त्यागी यांनी नमूद केले. फेब्रुवारी महिन्यात महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. त्यावेळीच अल्टिमेट लीगसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतील.

‘‘स्पर्धेचे प्रक्षेपण हक्क असलेल्या सोनी वाहिनीने आम्हाला ४ ते २६ जूनदरम्यानचा काळ उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यामुळे करोनाचा अडथळा न आल्यास या काळात सहा संघांमध्ये लीग होईलच. परंतु तसे न झाल्यास पुन्हा आणखी दोन-तीन महिने लीग लांबणीवर पडण्याची भीती आहे,’’ असे त्यागी यांनी सांगितले. अदानी समूह, गायक बादशाह, अभिनेता अभिषेक बच्चन यांनी काही संघांचे मालकी हक्क विकत घेतल्याचे समजते.

पहिलीच लीग महाराष्ट्राबाहेर?

अल्टिमेट लीगचे कोणत्या तरी एकाच राज्यात आयोजन करण्यात येणार असून सध्या मिळालेल्या माहितीनुसार नवी दिल्लीतील इंदिरा गांधी बंदिस्त स्टेडियममध्ये संपूर्ण स्पर्धा खेळवण्यात येऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील चाहत्यांना या स्पर्धेचा आनंद लुटता येणार नाही, असे दिसते. ‘‘करोना साथीच्या पार्श्वभूमीवर खो-खोपटूंना प्रवास तसेच हवामानाचा त्रास होऊ नये, या बाबींकडे आम्ही लक्ष देणार आहोत. विशेषत: पावसाचा अडथळा येऊ नये म्हणून बंदिस्त स्टेडियमला आमचे प्राधान्य असेल. नवी दिल्लीत मॅटवर नव्या नियमांसह खेळाडूंची चाचपणी घेण्यात आली. त्याला सर्वाचा उदंड प्रतिसाद लाभला. शक्यतो दिल्लीतच स्पर्धा खेळवण्याचा आमचा मानस आहे,’’ असे त्यांनी यांनी म्हटले.

Story img Loader