सालालाह (ओमान) : गतविजेत्या भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने कमालीचे सातत्य दाखवत थायलंडचा १७-० असा धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह भारतीय कनिष्ठ संघाने आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि याच वर्षी डिसेंबरमध्ये मलेशियात होणाऱ्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी पात्रताही सिद्ध केली.
भारताचा ‘अ’ गटातील हा अखेरचा सामना होता. भारतीय संघ गटात १० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. गटातील पाकिस्तान दुसरा अपराजित संघ असून, त्यांचा अखेरचा सामना जपानशी होणार आहे. या सामन्यानंतर गटातील क्रमवारी निश्चित होईल.
थायलंडवरील विजयात भारताकडून अंगद बीस सिंगने (१३ व्या मिनिटाला, ३३ व्या मि., ४७ व्या मि., ५५ व्या मि.) सर्वाधिक चार गोल केले. त्याला उत्तम सिंग (२४ व्या मि., ३१ व्या मि.), अमनदीप लाक्रा (२६ व्या मि., २९ व्या मि.) यांनी प्रत्येकी दोन, तर योगेम्बर रावत (१७ व्या मि.), अराइजित सिंग हुंडल (३६ व्या मि.), विष्णुकांत सिंग (३८ व्या मि.), बॉबी सिंग धामी (४५ व्या मि.), शारदानंद तिवारी (४६ व्या मि.), अमनदीप (४७ व्या मि.), रोहित (४९ व्या मि.), सुनीत लाक्रा (५४ व्या मि.) आणि राजिंदर सिंग (५६ व्या मि.) यांनी प्रत्येकी गोल करून सुरेख साथ केली.