शेवटच्या मिनिटांपर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत भारताने एक गोलच्या पिछाडीवरून कॅनडाला ३-२ असे हरवत कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत आपले आव्हान कायम राखले. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारताने हा पहिला विजय मिळवित तीन गुणांची कमाई केली.
मेजर ध्यानचंद स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत ६८ व्या मिनिटाला गुरजिंदर सिंगने पेनल्टी कॉर्नरद्वारा केलेला गोल भारतासाठी निर्णायक ठरला. भारताकडून अन्य गोल मनदीप सिंग (२८व्या मिनिटाला) व आकाशदीप सिंग (५७व्या मिनिटाला) यांनी केले. कॅनडाकडून सुखी पानेसर (तिसऱ्या मिनिटाला) व गॉर्डन जॉनस्टोन (५०व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
सामन्याच्या सुरुवातीलाच कॅनडाच्या खेळाडूंनी जोरदार चाल केली. तिसऱ्याच मिनिटाला त्यांच्या पानेसरने भारताचा गोलरक्षक हरज्योत सिंगला चकवत संघाचे खाते उघडले. अखेर २८व्या मिनिटाला मिळालेल्या तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरचा पुरेपूर फायदा घेत मनदीपने गोल करून १-१ अशी बरोबरी साधली.
उत्तरार्धात भारताला सामन्याच्या ४५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली होती. तथापि, त्याचा लाभ घेण्यात त्यांना अपयश आले. ५०व्या मिनिटाला जॉनस्टोन याने सुरेख गोल करत कॅनडाला आघाडीवर नेले. मात्र त्यांची आघाडी फार वेळ टिकली नाही. ५७व्या मिनिटाला आकाशदीपने पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल केला आणि २-२ अशी बरोबरी साधली. सामन्यास दोन मिनिटे बाकी असताना भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत गुरजिंदर याने गोल करीत संघास ३-२ अशी आघाडी मिळवून दिली आणि भारताच्या विजयाचा श्रीगणेशा केला.

Story img Loader