नवी दिल्ली : पुण्याच्या हर्षदा गरूडने सोमवारी ग्रीसमध्ये झालेल्या कनिष्ठ जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारी ती पहिली भारतीय वेटलिफ्टिंगपटू ठरली आहे. ४५ किलो वजनी गटात हर्षदाने स्नॅचमध्ये ७० किलो, तर क्लिन आणि जर्कमध्ये ८३ किलो असे एकूण १५३ किलोचे वजन उचलत अग्रस्थान पटकावले. तिने विशेषत: स्नॅचमध्ये फेरीगणिक आपली कामगिरी उंचावत ६४ किलो, ६७ किलो आणि नंतर ७० किलो वजनाची नोंद केली. तसेच तिने आपले तिन्ही क्लिन आणि जर्क प्रयत्न यशस्वीपणे पूर्ण करताना सर्वोत्तम ८३ किलोची नोंद केली.

या गटात टर्कीच्या बेक्तास कांसूने एकूण १५० किलो (६५ किलो आणि ८५ किलो) वजनासह रौप्य, तर माल्डोव्हाच्या हिन्कू तियोडोरा-लुमिनिताने एकूण १४९ किलो (६७ किलो आणि ८२ किलो) वजनासह कांस्यपदक मिळवले. भारताच्या अंजली पटेलला (एकूण १४८ किलो) पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. १८ वर्षीय हर्षदाने यापूर्वी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत जेतेपद मिळवले असून तिने २०२०मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत १३९ किलो वजन उचलत कांस्यपदक मिळवले होते.

देशासाठी सुवर्णपदक मिळवल्याने मी खूप आनंदीत आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केल्याचे समाधान आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूला मी आदर्श मानते. तिच्याप्रमाणेच ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करून पदक मिळवण्याचे माझे लक्ष्य आहे.

– हर्षदा गरूड  

Story img Loader