Champions Trophy 2025 Shoaib Akhtar statement on Virat Kohli : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत अपयशी ठरले होते. पर्थ कसोटीत कोहलीने शतक झळकावले होते, पण पुढील चार कसोटी सामन्यांमध्ये तो एकही मोठी खेळी खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत आता भारतासमोर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची मोठी परीक्षा आहे. अशात पाकिस्तानच्या माजी खेळाडूने टीम इंडियाला विराटबद्दल सल्ला दिला आहे.
शोएब अख्तरने टीम इंडियाला काय सल्ला दिला?
या दोन दिग्गजांशिवाय भारतीय संघाला जेतेपद मिळवणे फार कठीण आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला रोहित आणि विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल विचारले असता त्याने किंग कोहलीला जागे करण्यासाठी मजेशीर मार्ग सांगितला आहे. तो म्हणाला की, विराट कोहलीला जागे करायचे असेल, तर त्याला सांगा की पाकिस्तानविरुद्ध सामना आहे. पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.
विराटबद्दल शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य –
२०२२ मध्येही, जेव्हा कोहली फॉर्ममध्ये झगडत होता, तेव्हा त्याने मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध ८२ धावांची नाबाद खेळी साकारुन भारताला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. आज तकशी बोलताना शोएब अख्तर विराटबद्दल म्हणाला की, “हे बघा, तुम्हाला जर विराट कोहलीला जागे करायचे असेल, तर त्याला सांगा की पाकिस्तानविरुद्ध सामना आहे, तो जागा होईल. मेलबर्नमध्ये त्याने खेळलेली इनिंग बघा. मग तो जागा होईल. फॉर्ममध्ये नसलेले बरेच खेळाडू अशा वेळी फॉर्ममध्ये येतात.”
हेही वाचा – Rohit Sharma : ‘नवा कर्णधार शोधा…’, आढावा बैठकीत रोहित शर्माने बीसीसीआयकडे मागितली काही महिन्यांची मुदत?
पाकिस्तानचे स्टार फलंदाजही सध्या फॉर्मशी संघर्ष करताना दिसत आहेत. शोएब अख्तरला आशा आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यानही त्यांचा फॉर्म परत येईल. रावळपिंडी एक्स्प्रेसने पुढे म्हणाला की, “पाकिस्तानचा बाबर आझमही येऊन आपली चमक दाखवेल अशी अपेक्षा आहे. मला आशा आहे की एक चुरशीचा सामना होईल. बाबर इकडून धावा कराव्यात, विराटने तिकडून धावा कराव्यात. ज्यामुळे हा सामना पाहिला खूप मजा येईल.”