दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने आज पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. या परिषदेत स्टीव्ह स्मिथने आपली चूक मान्य करत ऑस्ट्रेलियन चाहत्यांची माफी मागितली. माझं क्रिकेटवर मनापासून प्रेम आहे, आणि भविष्यकाळात माझ्याकडून अशी चूक होणार नाही याची मी काळजी घेईन. जी चूक माझ्याकडून झालीये त्यासाठी मला चाहते माफ करतील अशी आशाही स्मिथने पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

साधारण साडेपाच मिनीटं चाललेल्या या परिषदेत स्मिथने अतिशय संयमाने पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली. यावेळी घडलेल्या प्रकारानंतर तु ऑस्ट्रेलियातल्या लहान खेळाडूंना काय सल्ला देशील असा प्रश्न विचारला असता, स्टीव्ह स्मिथच्या अश्रुंचा बांध फुटला. “कोणतीही लहान मुलं क्रिकेट खेळत असताना त्यांना पाहणं माझ्यासाठी खूप आनंददायी असतं. फक्त मैदानावर खेळत असताना ज्यावेळी निर्णय घेण्याची वेळ येते, त्यावेळी एकदा आपल्या आई-बाबांचा विचार करा. याप्रकरणात माझ्या कृत्याचा माझ्या आई-बाबांना नाहक त्रास सहन करावा लागला.” हे बोलत असताना स्टीव्ह स्मिथ भर पत्रकार परिषदेत रडला.

आपल्या सहकाऱ्याला रडताना पाहून अनेक माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी स्मिथचं सांत्वन करत, त्याला घडलेला प्रकार विसरुन जाण्याचाही सल्ला दिला.

Story img Loader