अल्वारो मोराटा आणि कालरेस टेव्हेझ यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर ज्युवेन्टस संघाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत रिअल माद्रिदला पराभवाचा धक्का दिला. या विजयासह ज्युवेन्टसने अंतिम लढतीत जेतेपदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे.
गेल्या हंगामातच मोराटा रिअल माद्रिदकडून ज्युवेन्टसच्या ताफ्यात दाखल झाला होता. पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्यांविरुद्ध खेळताना टेव्हेझने दिलेल्या आणि उसळी मिळालेल्या चेंडूला गोलजाळ्याची दिशा देत मोराटाने ज्युवेन्टसचे खाते उघडले. यानंतर दोन्ही संघांनी गोलसाठी जोरदार प्रयत्न केले मात्र भक्कम बचावामुळे त्यांना यश मिळाले नाही. ५७व्या मिनिटाला टेव्हेझने इकर कॅसिलसचा अभेद्य बचाव भेदत शानदार गोल केला. या गोलसह ज्युवेन्टसने आघाडी मिळवली. ७६व्या मिनिटाला रिअलचा आधारस्तंभ असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने हेडरद्वारे गोल करत बरोबरी केली. गोलपोस्टच्या अगदी जवळून अचूक हेडर करताना रोनाल्डोने ज्युवेन्टसचा गोलरक्षक गिआनलुईगी बफनला चकवले. उर्वरित वेळात बचावावर लक्ष केंद्रित करत ज्युवेन्टसने शानदार विजय साकारला.
१३ मे रोजी ज्युवेन्टस संघाला रिअल माद्रिदच्या घरच्या मैदानावर खेळायचे आहे. त्या लढतीत विजय मिळवल्यास ज्युवेन्टस संघाचे चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकते. २००३ मध्ये ज्युवेन्टस संघाने चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र त्या वेळी एसी मिलानने त्यांचे जेतेपदाचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नव्हते.
‘‘करीम बेन्झामाची आम्हाला उणीव जाणवली. आमच्या हातून काही चुका झाल्या. पुढच्या लढतीत मात्र आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल,’’ असे रिअलचे प्रशिक्षक कालरे अ‍ॅनकलोटी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा