ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी केलेल्या सर्व आरोपांचे खंडन करीत भारताचे मुख्य बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी या जोडीला भारतीय बॅडमिंटन असोसिएशन, भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) आणि केंद्र  सरकार यांच्याकडून सर्वतोपरी साहाय्य मिळेल, असे आश्वासन दिले.
रिओ ऑलिम्पिकसाठी तयारी करणाऱ्या पदक जिंकू शकणाऱ्या खेळाडूंसाठी राबवण्यात आलेल्या ‘टॉप’ (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम) योजनेतून ज्वाला आणि अश्विनीला वगळण्यात आले. या पाश्र्वभूमीवर कॅनडा खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यानंतर या दोघींनी गोपीचंद यांच्याविरोधात तोफ डागली होती. सर्व बॅडमिंटनपटूंना समान वागणूक द्यावी, अन्यथा राष्ट्रीय प्रशिक्षकपद सोडावे, असे आवाहन त्यांनी गोपीचंद यांना केले.
या आरोपांना प्रत्युत्तर देताना गोपीचंद म्हणाला, ‘‘याबाबत या दोघी बऱ्याचदा बोलल्या आहेत. त्यांनी त्यांच्या समस्या निश्चितपणे मांडायला हव्यात. केवळ आगपाखड करीत किंवा कुणाकडे अंगुलीनिर्देश करून समस्या सुटणार नाही. अशा प्रकारे घडते आहे, ते खरेच दुर्दैवी आहे. हे सारे सुधारण्यासाठी आपण सर्वानी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.’’
‘‘ज्वाला आणि अश्विनी सध्या साइ, भारतीय बॅडमिंटन असोसिएशन आणि केंद्र सरकारच्या सहकार्याच्या बळावरच विविध स्पर्धा खेळत आहेत. आपली दोन स्वतंत्र प्रशिक्षण शिबिरेसुद्धा राबवण्यात येत आहेत. ज्यापैकी एक इंडोनेशियाच्या परदेशी प्रशिक्षकाचे आहे आणि दुसरे दुहेरी विशेषज्ञ प्रशिक्षकाचे. गेल्या काही वर्षांत त्यांना अपेक्षित असलेले सर्व पाठबळ देण्यात आलेले आहे. त्यामुळेच बऱ्याच स्पर्धामध्ये त्यांना कर्तृत्व दाखवता आलेले आहे,’’ असे गोपीचंद यांनी सांगितले.
‘टॉप’ योजनेतून वगळल्याबद्दल ज्वालाने गेल्या महिन्यात आपली नाराजी प्रकट केली होती. अश्विनीनेही नुकतीच क्रीडा मंत्रालयावर टीका केली होती. ‘साइ’चे महासंचालक इंजेटी श्रीनिवास यांनीसुद्धा गोपीचंद यांची बाजू घेताना सांगितले की, ‘‘साइ किंवा क्रीडा मंत्रालय कोणत्याही खेळाडूच्या बाबतीत पक्षपात करीत नाही.’’

Story img Loader