राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी आपला मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयाने प्राजक्ता सावंतच्या बाजूने निकाल दिल्याच्या दोन दिवसांनंतर दुहेरीतील अव्वल बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टा हिनेही प्राजक्ताच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे ठरवले आहे. हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय निवड शिबिरासाठी उपस्थित राहण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने प्राजक्ताला परवानगी दिली आहे.
ज्वाला गट्टा म्हणाली, ‘‘बॅडमिंटन खेळातील तारतम्याबाबत मी नेहमीच आवाज उठवला आहे. सध्याच्या प्रकरणाने बॅडमिंटनमधील वाद चव्हाटय़ावर आले. प्राजक्ताने संपर्क साधून झाल्या प्रकाराबद्दल सर्व काही मला सांगितले. कोर्टाचा निकाल वाचल्यानंतर मी तिला पूर्णपणे पाठिंबा जाहीर केला. पक्षपात, राजकारण आणि वादविवाद हे बॅडमिंटनमध्ये बऱ्याच काळापासून सुरू आहेत. या खेळाच्या भवितव्याबाबत मला चिंता असल्यामुळेच मी माझे शब्द मागे घेणार नाही. प्राजक्ताला राष्ट्रीय शिबिरातून बाहेर काढल्यानंतरही मी आवाज उठवला होता, पण त्या वेळी कुणालाही माझे म्हणणे पटले नव्हते. या प्रकरणाचा शेवट कसा होतोय, याकडे माझे बारकाईने लक्ष आहे. प्राजक्ताला माझ्या मदतीची गरज भासल्यास, सर्वतोपरी मदत करण्यासाठी मी तयार आहे.’’
‘‘मी वैयक्तिक व्यक्तींविरुद्ध भांडत नसून यंत्रणेविरुद्ध आवाज उठवला आहे. सरकारकडून आम्हाला ज्या प्रकारची मदत मिळत आहे, त्यातून एखादीच सायना नेहवाल किंवा ज्वाला तयार होऊ शकत नाही. माझ्यासह अश्विनी आणि दिजूनंतर एकही दुहेरीची जोडी आपण तयार करू शकलेलो नाही, पण याबद्दल कुणी बोलायलाही तयार नाही,’’ असे ज्वालाने सांगितले. दरम्यान, या वादग्रस्त मुद्दय़ावर भाष्य करण्यास गोपीचंद यांनी नकार दिला.

Story img Loader