भारतीय खेळाडूंचे जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान गुरुवारीच संपुष्टात आले. एकेरीबरोबरच दुहेरीतही भारतीय खेळाडूंना निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागले.
तन्वी लाडने पहिल्या फेरीत १८ व्या मानांकित किस्र्टी गिलमोर हिला पराभूत केले होते. मात्र दुसऱ्या फेरीत तिला चीनच्या झिन लिऊ हिने २१-१८, २१-१२ असे हरविले. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांना दक्षिण कोरियाच्या कियांग युनजुंग व हाना किम यांच्याविरुद्ध १२-२१, २३-२१, १९-२१ अशी हार पत्करावी लागली.
पुरुषांच्या एकेरीत सौरभ वर्मा याला जपानच्या केनिची तागो याने २१-९, २१-६ असे सहज पराभूत केले. मिश्र दुहेरीत तरुण कोना व अश्विनी पोनप्पा यांना जपानच्या मिसाकी मात्सतोमो व केनिची हायाकावा यांनी २१-१७, २१-११ असे २७ मिनिटांत पराभूत केले.
श्रीकांतची घसरण
नवी दिल्ली : स्पर्धेतील झटपट पराभवाचा परिणाम किदम्बी श्रीकांतच्या क्रमवारीतील स्थानावर झाला आहे. दहा स्थानांनी घसरण होऊन तो २३व्या स्थानी फेकला गेला आहे. पारुपल्ली कश्यपने मात्र अव्वल वीसांमध्ये पुनरागमन केले. पी.सी.तुलसीने सात स्थानांनी आगेकूच करत ५३वे स्थान गाठले.

Story img Loader