भारताची महिला दुहेरीतील अव्वल बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टाला उजव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेला मुकावे लागणार आहे.
विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या ज्वालाला उजव्या गुडघ्यामध्ये कणकण जाणवत होती, त्यामुळे तिने डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांनी काही चाचण्यांनंतर तिला दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ज्वालाला आशियाई क्रीडा स्पर्धेला मुकावे लागणार आहे.
‘‘विश्व अजिंक्यपद स्पर्धेनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सराव करत असताना उजव्या पायाच्या गुडघ्यामध्ये थोडी दुखापत झाल्याचे वाटत होते. पण माझ्यासहित प्रशिक्षकांनाही ही दुखापत गंभीर असल्याचे वाटले नाही. पण जेव्हा वेदना असह्य़ व्हायला लागल्या तेव्हा मी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे ठरवले,’’ असे ज्वालाने सांगितले.
ज्वालाने अश्विनी पोनप्पासह उबेर चषकामध्ये ऐतिहासिक कांस्यपदकाला गवसणी घातली होती. आशियाई स्पर्धेत ही जोडी सुवर्णपदक पटकावेल, अशी बऱ्याच जणांना आशा होती.
दुखापतीबद्दल ज्वाला पुढे म्हणाली की, उजव्या गुडघ्याला सूज आली असून मी दोन डॉक्टरांचा याबाबत सल्ला घेतला आहे. दोन्ही डॉक्टरांनी मला १०-१२ दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याने मला आशियाई स्पर्धेत खेळता येणार नाही. सध्या सूज कमी झाली असली तरी मला उभे राहताना समस्या जाणवत आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धेत खेळण्याची जोखीम मी पत्करू शकत नाही.’’

Story img Loader