नवी दिल्ली :सायप्रस आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेतील १०० मीटर अडथळा शर्यतीमधील सुवर्णपदकासह ज्योती याराजीला अखेरीस तिसऱ्या प्रयत्नात १३.२३ सेकंदांच्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद करण्यात यश आले. याआधी दोनदा ज्योतीचा राष्ट्रीय विक्रम नोंदवण्यात आला नव्हता.
आंध्र प्रदेशच्या २२ वर्षीय ज्योतीने मंगळवारी १३.३८ सेकंदांचा जुना विक्रम मोडीत काढला. तो २००२ मध्ये अनुराधा बिस्वालने नोंदवला होता. जागतिक अॅथलेटिक्स खंडीय स्पर्धेतील ही ‘ड’ विभागाची स्पर्धा आहे.
भुवनेश्वरमधील ओडिशा अॅथलेटिक्स उच्च कामगिरी केंद्रात ज्योती जोसेफ हिलियर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. गेल्या महिन्यात कोळीकोडे येथे झालेल्या फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत तिने १३.०९ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. परंतु वाऱ्याचा वेग अपेक्षित प्रमाणापेक्षा अधिक असल्याने तो विक्रम नोंदवण्यात आला नाही. त्याआधी, ज्योतीने २०२०मध्ये झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत १३.०३ सेकंदांची राष्ट्रीय विक्रमाची वेळ नोंदवली होती. मात्र, स्पर्धेला राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेने (नाडा) तिची उत्तेजक चाचणी न घेतल्याने आणि भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे तांत्रिक शिष्टमंडळ उपस्थित न राहिल्याने ज्योतीचा राष्ट्रीय विक्रम ग्राह्य धरण्यात आला नव्हता.
पुरुषांच्या २०० मीटर शर्यतीत अमलन बोरगोहेनने २१.३२ सेकंद वेळेसह कांस्यपदक पटकावले. त्यानेसुद्धा फेडरेशन चषक स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.