Athletes Jyothi Yarraji: स्टार अ‍ॅथलीट ज्योती याराजीने शुक्रवारी चीनमधील चेंगडू येथे जागतिक युनिव्हर्सिटी क्रीडा स्पर्धेत १०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकण्याचा स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला. २३ वर्षीय याराजीने महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीच्या अंतिम फेरीत १२.७८ सेकंदाची वेळ नोंदवून तिसरे स्थान पटकावले. या कामगिरीसह, तिने ऑक्टोबर २०२२ मध्ये नोंदवलेला १२.८२ सेकंदांचा आपला पूर्वीचा राष्ट्रीय विक्रम सुधारला. 

स्लोव्हाकियाच्या व्हिक्टोरिया फोर्स्टरने १२.७२ सेकंदात सुवर्ण, तर चीनच्या यानी वूने १२.७६ सेकंदात रौप्यपदक जिंकले. आणखी एक राष्ट्रीय विक्रमी धावपटू अमलान बोरगोहेन यानेही पुरुषांच्या २०० मीटरमध्ये हंगामातील सर्वोत्तम वेळ २०.५५ सेकंदासह कांस्यपदक जिंकले. महिलांच्या १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ज्योतीने १२.७८ सेकंदाची वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. पण, ०.०१ सेकंदाने तिचे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचे (१२.७७ सेकंद) तिकीट हुकले. १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीतीत भारताची ती सर्वात वेगवान धावपटू ठरली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या त्सेबो इसाडोर मात्सोसोने २०.३६ सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले तर जपानच्या युदाई निशीने २०.४६ सेकंदात दुसरे स्थान पटकावले. शुक्रवारी या दोन पदके जिंकत आता भारत आता ११ सुवर्ण, ५ रौप्य आणि ९ कांस्य पदकांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. पदकतालिकेत चीन अव्वल, त्यानंतर कोरिया आणि जपानचा क्रमांक लागतो.

ज्योती याराजीचा जीवनप्रवास

ज्योती याराजी यांचा जन्म २८ ऑगस्ट १९९९ रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे झाला. सूर्यनारायण असे त्याच्या वडिलांचे नाव असून ते खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. ज्योतीची आई कुमारी हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करते, तसेच त्या लोकांच्या घरी धुणीभांडी धुवायचे देखील काम करतात.

ज्योती याराजीचे शिक्षण व खेळाचे प्रशिक्षण

ज्योतीच्या कुटुंबाचे उत्पन्न सुमारे १८,००० रुपयांपेक्षा कमी होते. या पैशातून घराच्या गरजा आणि मुलांचे शिक्षण भागवायचे. पण ज्योतीने लहानपणापासूनच आपल्या ध्येयाच्या दिशेने शोध सुरू केला होता. ती विराजच्या पोर्ट हायस्कूल, कृष्णा येथे शिकत होती, जेव्हा तिच्या शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी ज्योतीची प्रतिभा ओळखली आणि ती एक उत्तम अ‍ॅथलीट बनू शकते हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तिचे प्रशिक्षण सुरू झाले, आई-वडिलांनीही ज्योतीला साथ दिली. मात्र, ज्योतीनेही आपला अभ्यास सुरू ठेवला आणि आचार्य नागार्जुन विद्यापीठातून बीए इतिहासात पदवी पूर्ण केली.

हेही वाचा: Ireland Squad vs India: जसप्रीत बुमराहसमोर आयर्लंडचे आव्हान! आयरिश क्रिकेट बोर्डाने केला संघ जाहीर, जाणून घ्या

ज्योती याराजीने २०१५ साली आंध्र प्रदेश आंतर जिल्हा मेळाव्यात सुवर्णपदक जिंकले, ज्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. ज्योतीने हैदराबादमध्ये ऑलिम्पियन आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक एन. रमेश आणि भुवनेश्वरमध्ये ब्रिटिश प्रशिक्षक जेम्स हिलियर यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले. विश्वविक्रम रचणाऱ्या ज्योतीचे पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट हुकले मात्र, केवळ कांस्य पदकच नव्हे तर भारतीयांची मने जिंकली.